*सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’ तळाशील ग्रामस्थांचे जलआंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांसहित जिल्हा प्रशासनातील अधिकारी नाच-गाण्यात व्यस्त*
*बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी खपवून घेतली जाणार नाही : मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा.*
कुडाळ
एकीकडे जिल्ह्याचे रक्षणकर्ते मानले जाणारे जिल्हाधिकारी ३१ मार्चचा १०० टक्के निधी खर्च झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत डान्समध्ये मग्न आहेत, तर दुसरीकडे तळाशीलमधील ग्रामस्थ आपले गाव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून भर खाडीत बोटी टाकून ‘जलआंदोलन’ करत आहेत.अवैध वाळू उपशामुळे तळाशील गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाडीपात्राचे नुकसान होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत खाडीत बोटीत बसून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाचा इतका वेळ उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांनी साधी भेट देण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही.
दुसरीकडे, ३१ मार्च रोजी जिल्हा निधी १०० टक्के खर्च झाला, याचे निमित्त साधून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
बरं कार्यालयीन वेळ सोडून अधिकारी एक व्यक्ती म्हणून आपण खाजगी आयुष्यात काय करता यावरही आक्षेप नाही. परंतु शंभर टक्के निधी खर्च झाला असे दाखवतात ते प्रत्यक्षात आहे की फक्त कागदावरच हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वेळा या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अवैद्य धंदे बंद करण्याचे कठोर आदेश देताना आम्ही पाहतो परंतु हे अधिकारी त्याकडे साफ दुर्लक्षच करताना दिसतात. यावर लोकशाहीचा एक महत्त्वाचा चौथा स्तंभ म्हणून एखाद्या पत्रकाराने अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील पणा बाबत आवाज उठवल्यास त्यांना दमदाटी करणे निषेधार्थ आहे. पत्रकार बांधवांना दमदाटी केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पत्रकार बांधवांच्या पाठी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी या पत्रकाद्वारे दिले आहे.
