You are currently viewing कोकण वाचतला कसा ?

कोकण वाचतला कसा ?

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*

भाग:५८

 

*कोकण वाचतला कसा ?*

 

काकल्या आला तेव्हा चिंतेत दिसला. मला म्हणाला, “मिटींगेग जातलय?”

मी म्हणालो,”कुठल्या?”

“अरे, कोकण वाचवच्या. फाल्याच्या आयताराक शाळेत ठेयलाहा मिटींग.” काकल्याने विषय सांगितला.

“हो, जायलाच हवं. जिव्हाळ्याचा विषय आहे.” मी म्हणालो.

“पून बर्‍याचदा मिटींग लायणारेच जम्नी इकूच्ये एजंट आसतत. ते काय वाचयतले गाव? खोट्याची दुनिया हा. काऽय होवचा नाय.” काकल्या तिरीमिरीत म्हणाला.

” अरे, तरीही प्रयत्न करायला हवेत. नकारात्मक विचार उपयोगी नाहीत.” मी समजावत म्हणालो.

“पून माका भविष्य काय बरा दिसणां नाय; कारण ज्येंच्यानी गाव सोडलो, त्येंका गाव वाचवचो हा, ज्ये गावात रवान गाव चलयतहत त्येंका गाव इकूचो हा आनि बाकी सगळे हाताक पैसो लागलो काय व्हावत चल्लेत. कसो गाव वाचतलो, तो सांग.” काकल्याने चित्र स्पष्ट केले.

तो बोलत होता ते बरोबर होतं. गावात तळमळीची चार माणसे आहेत, पण त्यांचा आवाज क्षीण झालाय. बहुतेक जण झाडं तोडताहेत, जमीनी विकताहेत, चिरेखणी चालवताहेत आणि कोकण वाचवायच्या बाता मारताहेत. गावाचं एकंदरीत शहर होत आहे. लोकाना दिखाव्याची चटक लागलीय, कष्ट नको वाटताहेत, स्वस्तातला व्यवहार हवाय. चित्र अगदी विदारक आहे.

“गावात सत्तर टक्के स्लापाची घरा झालीत. बावी बरोबरीन बोअर इले. शेती पाव हिश्श्यार इली. चायनीजचे गाडे लागलेत, दारात चारचाकी इली. शहरातले कष्ट आनी धावपळ सोडून पूरा शहर गावात इलाहा. काय आनी कसा वाचवया ता सांग.” काकल्या मला निरुत्तर करत होता.

“मग काय, याला उपाय नाही?” मी विचारले. अजून माझ्याकडेही बोलण्यासारखे तसे काही नव्हते.

“उपाय हुंजे, जसा थेंबाथेंबान तळा साचता ; तसा परत्येकान प्रयत्न केलो, तर काय तरी होव शकता. ह्या सगळ्याक मान्यय हा, पून शिवाजी दुसर्‍यागेर जन्माचो, तसा मिया सोडून बाकीच्यांनी करूचा ही मानसिकता. अश्यान काय होवचा नाय.” काकल्या हतबल दिसला. थोडं थांबून म्हणाला,”आजूनय येक उपाय हा. फुडाऱ्याक आचारसंहिता लावक होयी. जसा कोकण आसाक होया; तसा त्येनी सवता जगायचा. कौलाच्या घरात रवायचा, पेजभात जेवायची, गरजेपुरती येकच गाडी ठेवायची, सुती कपडे वापरायचे;मगे त्येंच्या मावळ्यांकाय सुधराचा लागतला. पून ह्या सांगतलो कोन? अरे,हजार दिले काय मत बदलणारे आमी, ह्या सांगा शकतो काय? ” निर्वाणीचा प्रश्न विचारून काकल्या चालता झाला आणि मी मिटींगच्या तयारीला लागलो.

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा