संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश; दिवसातून दोन वेळा सेवा सुरू करण्याचाही विचार करण्याचे
मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी लवकर सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली. बैठकीस विमानचालनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापक प्रांजली खवळे, कार्यकारी अभियंता मिस्बाह अन्वार आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, चिपी मुंबई हवाई वाहतूक करिता शासनाकडून Viability Gap Funding VGF मंजूर आहे. मात्र विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. यासाठी संबंधित कंपनीने विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी अशी दिवसातून दोन वेळा विमान सेवा सुरू करण्याबाबतही कंपनीने विचार करावा असेही ते म्हणाले.
चिपी मुंबई विमान सेवा सूरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा परवानग्यासह अन्य परवाने घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
