*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित काव्याचे विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*
*सोज्वळता*
〰️〰️〰️〰️
हळव्या मनात माझिया
भावप्रितीचे शुभ्र चांदणे
भावपूर्ण अधीर अबोली
तानसेनी स्वरमुग्धी गाणे
शब्दस्वरात तूच सुगंधा
भावगीतात गंधर्व तराणे
मनसोक्त रमता एकांती
अधरी पाझरे सुरेल गाणे
दरवळतो बहावा मोगरा
प्रसन्नतेत तृप्तते जगणे
वृंदावनी तेवता फुलवाती
सोज्वळ विश्वरूप देखणे
〰️〰️〰️〰️〰️〰️
*वि.ग.सातपुते (भावकवी )*
📞*(9766544908)*
भावकवी आप्पांच्या ‘सोज्वळता’ या कालजयी रचनेतून बाह्य निसर्ग आणि मानवी अंतर्मन यांच्यातील अद्वैताचा एक अलौकिक आध्यात्मिक प्रवास उलगडतो. ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नसून निसर्ग आणि आत्म्याच्या एकात्मतेचे सखोल चिंतन आहे. आप्पांच्या प्रत्येक शब्दातील गूढता आणि अर्थपूर्णतेचा वेध घेतल्यास, कवितेतील सुप्त भाव अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्यांच्या शब्दसृष्टीचा हा अंतर्यामी प्रवास समजून घेतल्यास कवितेचे मर्म उलगडणे अधिक सहज आणि अर्थपूर्ण ठरते.
हळव्या मनात माझिया
भावप्रितीचे शुभ्र चांदणे
भावपूर्ण अधीर अबोली
तानसेनी स्वरमुग्धी गाणे
‘हळवे मन’ म्हणजे केवळ संवेदनशीलता नव्हे, तर कोमल भावनांनी ओतप्रोत भरलेले एक अथांग अंतःकरण. बाह्य जगातील कोलाहलापेक्षा मनाचा हा कोपरा किती हळवा आणि नाजूक आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आप्पांनी ‘हळव्या’ या शब्दाचा अचूक प्रयोग केला आहे. या नाजूक मनात पसरलेला प्रकाश हा लौकिक नसून तो ‘शुभ्र प्रेमाच्या चांदण्यांचा’ आहे. शीतल, पवित्र आणि सात्विक अशा या प्रेममयी चांदण्यांनी मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघाला आहे. प्रिती आणि भक्तीतील उत्कटता मांडताना त्यांनी या भावनेला ‘शुभ्र चांदण्यांची’ उपमा दिली आहे; कारण ज्याप्रमाणे चांदणे मनाला शांती देते, तशीच ही प्रिती कोणतीही अपेक्षा न ठेवता निर्मळ आणि निःस्वार्थ आहे.
मनातील या गूढ अवस्थेला व्यक्त करण्यासाठी आप्पांनी ‘भावपूर्ण अधीर अबोली’ ही संकल्पना वापरली आहे. अबोलीचे फूल जसे शांत राहूनही आपले सौंदर्य व्यक्त करते, तसाच मनातील हा भाव व्यक्त होण्यासाठी ‘अधीर’ असला तरी तो ‘अबोली’च राहतो. तो शब्दांत मांडण्यापेक्षा केवळ डोळ्यांतून किंवा स्वरांतून अनुभवायचा विषय आहे. ज्याप्रमाणे संगीतातील सिद्धहस्त गायक तानसेन जेव्हा गातात, तेव्हा त्यांच्या स्वरातील तीव्रता शब्दांच्या सीमा ओलांडून थेट आत्म्याला भिडते, तसेच हे गाणे केवळ श्रवणाचे नसून त्यात विरघळून जाण्याचे आहे. ही प्रिती मग ती मानवी असो वा ईश्वरी, ती एका मधुर आणि तल्लीन करणाऱ्या धूनप्रमाणे आयुष्यात सात्विक प्रकाशाचे चांदणे पसरवत राहते.
शब्दस्वरात तूच सुगंधा
भावगीतात गंधर्व तराणे
मनसोक्त रमता एकांती
अधरी पाझरे सुरेल गाणे
मनातील या भावना इतक्या सुश्राव्य आणि मोहक आहेत की, तानसेनांच्या सुरावटीप्रमाणे त्या मनाला मंत्रमुग्ध करतात. ज्याप्रमाणे फुलांचे अस्तित्व सुगंधाशिवाय अपूर्ण आहे, तसेच शब्दांना सुरांची साथ लाभली की त्याचे गाणे बहरते. येथे आप्पांनी शब्द, सूर आणि गंध यांचा एक अपूर्व त्रिवेणी संगम साधला आहे. माझ्या अभिव्यक्तीचे मूळ आणि त्यातील माधुर्य ‘तू’च आहेस, हा भाव ते अत्यंत खुबीने मांडतात. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ती मनाला तृप्त करणारी एक ‘अत्तरवजा जाणीव’ आहे; कारण संगीताच्या स्पर्शामुळेच शब्द जिवंत होतात आणि एका अलौकिक आनंदाची प्रचिती येते.
एकांताच्या क्षणी, जेव्हा माणूस स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधतो, तेव्हा त्याच्या विचारांत केवळ तुझेच अस्तित्व असते. अशा वेळी मन आनंदाने काठोकाठ भरून येण्यासाठी संगीत हाच सर्वात मोठा सोबती ठरतो. तेव्हा जे गाणे ओठांवर येते, ते प्रयत्नपूर्वक गायलेले नसून अंतर्मनातून उत्स्फूर्तपणे पाझरलेले एक ‘प्रेमगीत’ असते. प्रिय व्यक्ती किंवा ईश्वराच्या ध्यासाने माणसाचे संपूर्ण अस्तित्व शब्द आणि स्वरांसारखे कसे सुगंधी होते, याचे अत्यंत तरल आणि भावूक वर्णन आप्पांनी या ओळींतून साकारले आहे.
दरवळतो बहावा मोगरा
प्रसन्नतेत तृप्तते जगणे
वृंदावनी तेवता फुलवाती
सोज्वळ विश्वरूप देखणे
आप्पांच्या या काव्यपंक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने कवितेतील ‘मेरुमणी’ आहेत; जिथे बाह्य निसर्ग आणि मानवी अंतर्मन यांचे अद्वैत सखोलपणे उलगडते. येथे ‘बहावा’ म्हणजे अमलतास -ज्याला साहित्यात ‘सुवर्णलेणं’ किंवा ‘चैत्राचे सुवर्ण झुंबर’ म्हटले जाते -तो रणरणत्या उन्हातही एखाद्या आशावादी स्वप्नासारखा पिवळ्याधमक फुलांनी बहरून येतो. दुसरीकडे मोगऱ्याचा तो सात्विक सुगंध, ज्याचे वर्णन खुद्द माऊलींनी ‘मोगरा फुलला’ या शब्दांत अजरामर केले आहे. हा सुगंध लपवूनही लपत नाही.
आप्पांनी या ओळींतून बहाव्याचे सौंदर्य आणि मोगऱ्याचा सुगंध यांचा एक ‘सोज्वळ मिलाफ’ साधला आहे. हे केवळ निसर्गवर्णन नसून सौंदर्य आणि सुगंधाचे आत्मिक मिलन आहे. जेव्हा माणसाचे विचार शुद्ध होतात, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा दरवळही असाच दशदिशांना पसरतो. ही फुले केवळ मन प्रसन्न करत नाहीत, तर जीवनातील तृप्ततेची प्रचिती देतात. आप्पांना येथे हेच सुचवायचे आहे की, ‘जगणे’ ही केवळ क्रिया असली, तरी ‘प्रसन्नतेत आणि तृप्ततेत जगणे’ ही एक श्रेष्ठ कला आहे. बाह्य जगातील कोलाहलातही ज्याचे अंतर्मन शांत आहे, तोच खऱ्या अर्थाने तृप्त असतो.
वृंदावनी तेवता फुलवाती’ या ओळीतून आप्पा वाचकांसाठी एक विलक्षण ‘भाव-भ्रम’ (Twist) निर्माण करतात. येथे त्यांना केवळ अंगणातील तुळशीवृंदावन अभिप्रेत नसून, आपले ‘शुद्ध अंतःकरण’ अपेक्षित आहे. जेव्हा अंतर्मनात भक्ती आणि ज्ञानाच्या फुलवाती प्रज्वलित होतात, तेव्हा अज्ञानाचा तिमिर क्षणात लोप पावतो आणि आत्मप्रकाशाचा उदय होतो. अशा तेजोमय आणि प्रसन्न अंतर्मनातूनच मग चराचरात ईश्वराचे ‘विश्वरूप दर्शन’ घडू लागते. हे दर्शन जरी विराट असले, तरी ते अत्यंत ‘सोज्वळ’ आणि विकारमुक्त असते. अशा निर्मळ दृष्टीला मग संपूर्ण जगच अतीव सुंदर, पवित्र आणि मंगलमय भासू लागते.
अशाप्रकारे, या एकाच रचनेतून आप्पांनी निसर्ग, भक्ती आणि प्रिती यांचा एक अनुपम त्रिवेणी संगम घडवून आणला आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या विशालतेशी एकरूप होतो आणि आपल्या अंतर्मनातील शुद्धता जपतो, तेव्हाच या चराचरात आपल्याला त्या ईश्वरी तत्त्वाचे ‘सोज्वळ’ दर्शन घडते. ‘सोज्वळता’ म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नसून, ती अंतरातील निर्मळतेतून उमललेली एक दिव्य अनुभूती आहे, हेच भावकवी आप्पा आपल्या या अजरामर कवितेतून अत्यंत तरलतेने अधोरेखित करतात.
*© विनय पारखी*
