You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चिंचवडमध्ये भव्य नारीशक्ती गुणगौरव सोहळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चिंचवडमध्ये भव्य नारीशक्ती गुणगौरव सोहळा

४ पुस्तकांचे प्रकाशन, पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय काव्यसंमेलन उत्साहात संपन्न

संभाजीनगर-चिंचवड / (प्रतिनिधी):

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तसेच ८ मार्च महिला दिनाच्या औचित्याने चिंचवड येथे भव्य “नारीशक्ती गुणगौरव सोहळा”, चार पुस्तकांचे प्रकाशन आणि खुले काव्यसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. श्रीपाल सबनीस सर व मा. ललिताताई सबनीस यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सबनीस यांनी समाजजागृतीचा संदेश देताना “आजही लोक बुवाबाजीवर विश्वास ठेवतात, ही चिंतेची बाब असून समाजाने सजग होणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यांनी सर्व पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करून प्रकाशित पुस्तकांचे लोकार्पण केले.

मा. ललिताताई सबनीस यांनी साहित्यिकांना शुभेच्छा देत “लेखणी अशीच धारदार ठेवा,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

पहिल्या सत्रात उद्घाटक प्रा. पांडुरंग भोसले, डॉ. शैलेंद्र भणगे तसेच स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. संभाजी मलघे, लक्ष्मण शिंदे, महादेव रोकडे, रज्जाक शेख, डॉ. मिलिंद चौधरी, अंजना धायगुडे, सीताराम नरके, व्यंकटराव वाघमोडे, दत्तू ठोकळे व आत्माराम हारे उपस्थित होते.

या सोहळ्यात उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका शैलेजाताई मोरे व जागतिक आरोग्य सल्लागार सोनल जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर-हिरकणी गौरव पुरस्कार २०२६” अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कविता काळे (साहित्य), सारिका आस्मर (शिक्षिका), शरणव्वा बनसोडे (सेविका), कल्पना यादव (परिचारिका), उषा भोसले (सामाजिक कार्य), गजाला सय्यद (पत्रकारिता), डॉ. प्राजक्ता महाजन (वैद्यकीय क्षेत्र) आणि अंजू सोनवणे (रक्तदाता) यांचा समावेश होता.

कार्यक्रमात प्रतिमा काळे यांच्या “काळजातली साद”, “चारोळी संग्रह”, “जागर स्त्री शक्तीचा” तसेच धनंजय इंगळे यांच्या “भावगंध चारोळी संग्रह” आणि “काव्यसरिता” या पुस्तकांचे भव्य प्रकाशन करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात राज्यभरातील सुमारे ६० कवींनी आपल्या रचना सादर करत काव्यसंमेलन रंगविले. या सत्राचे अध्यक्ष मा. म. भा. चव्हाण, स्वागताध्यक्ष राजन लाखे तर उद्घाटक म्हणून अरुण बोराडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. दिनेश भोसले व सौ. राजश्री मराठे यांनी केले. या भव्य सोहळ्याचे आयोजन प्रतिमा काळे (खेमनर) व धनंजय इंगळे यांनी केले असून संपूर्ण संयोजन अंजना राजू धायगुडे यांनी सांभाळले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रतिमा काळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा