भोगवेतील महेश सामंत यांना पर्यटन विकासाचा ध्यास..
संपादकीय…..
निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. सागर किनारे, नद्या, नैसर्गिक तलाव, डोंगर, बाग बागायती यांचा उत्तम समतोल साधून सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांनी नटलेला आहे. परंतु शेजारील गोवा राज्यांपेक्षा सुंदर समुद्र किनारे लाभूनही जिल्ह्यात पर्यटन विकास म्हणावा तसा झालेला नाही.
कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम तसेच देवबाग सारखे सदाहरित बेट असं अनन्यसाधारण सौंदर्य लाभलेलं भोगवे सारखा सुंदर समुद्र किनारा जिल्ह्यात आहे. देशातील सर्वात सुंदर असलेल्या भोगवे बीच ला “ब्लू फ्लॅग्स” सारखं मानांकन प्राप्त झालेलं आहे. जर या मानांकनाचे रूपांतर अवॉर्ड मध्ये झाले आणि “ब्लू फ्लॅग्स” अवॉर्ड मिळाला ते आंतरराष्ट्रीय सर्व पर्यटनाचा ओघ आपोआपच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे गावात येईल. एवढं सुंदर बीच वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथे आहे.
एमटीडीसीने पंधरा वर्षांपूर्वी तंबू निवास उभारून तारकर्ली या भागाचा विकास केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर तारकर्ली हे पर्यटन स्थळ आणले होते. याचाच परिणाम म्हणून तारकर्ली येथे सहा लाखांच्या वर पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत. परंतु त्या तुलनेने वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे बीच, कोंडुरा बीच, खवणे बीच, ही मात्र पर्यटन विकासाच्या दृष्टीने मागे पडली आहेत ही बाब चिंताजनक आहे.
‘लिला’स बांबू रिसॉर्ट आणि बोटिंग वॉटर स्पोर्ट्स चे मालक महेश सामंत हे पर्यटनासाठी २० गुंठे जागा मिळणाऱ्या लाभार्थ्यांपैकी एक आहेत. ५० लाभार्थांमधून २३ जण सिलेक्ट झाले होते, पैकी १ लाभार्थी मयत झाल्याने २२ लाभार्थी शिल्लक राहिले, महेश सामंत हे त्यापैकी एक. लिला हे त्यांच्या मातोश्रींचे नाव. रिसॉर्ट चे नाव आईचे आहे हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले, त्या मागचा इतिहास देखील खूप मोठा आहे असेही ते म्हणाले.
पर्यटनात जिल्हा का मागे पडतो याबाबत बोलताना ते म्हणाले, जलक्रीडा म्हणजे बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प यांची परवानगी सिंधुदुर्गात यावी. मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून जलक्रीडा परवाने दिले जातात. हे परवाने मिळविणे हेच खूप खर्चिक काम आहे. पर्यटनासाठी आणि रोजगाराच्या दृष्टीने काम करणारे लोक आपल्याकडे आहेत, परंतु गोरगरिब माणसाला हे परवाने मिळविणे परवडणारे नाही. त्यामुळे हे प्रकल्प परवाने सिंधुदुर्गात यावे. जिल्हा उद्योग केंद्रात एमटीडीसी कार्यालय आणा अशीही आग्रहाची मागणी महेश सामंत यांनी केली. आणि जर असं झालंच तर जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवून लाखोंच्या पटीत पर्यटक जिल्ह्यात येतील यात शंकाच नाही.