भाजप स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
अजित नाडकर्णींकडून फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राला ब्लड शुगर तपासणी यंत्र भेट
डॉ. यादव यांचे स्वागत; आरोग्य सेवेसाठी योगदानाचे कौतुक
फोंडाघाट :
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राला ब्लड शुगर तपासणीचे उपकरण भेट देत आरोग्य सेवेत मोलाचे योगदान दिले. या उपक्रमामुळे रुग्णांना त्वरित तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी नाडकर्णी यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. “तुम्ही यापूर्वीही टी.व्ही. प्युरिफायरसारखी उपयुक्त साधने दिलीत. तुमच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही पेशंट म्हणून नव्हे, तर काका म्हणून या रुग्णालयात नेहमीच स्वागतार्ह आहात,” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
अजित नाडकर्णी यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सामाजिक कार्यातून मला ऊर्जा मिळते. माझे वडील स्व. बाबासाहेब नाडकर्णी आणि माझी पत्नी शुभांगी यांचा कायमच पाठिंबा असतो. त्यामुळेच ही सेवा घडत आहे.”
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून नाडकर्णी यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
