₹४२७७.६६ कोटींवरून ₹७१७६.२१ कोटींवर व्यवसाय; नफा ₹१६ कोटींवरून ₹५० कोटींवर, १८ शाखा व ४२ एटीएमद्वारे सेवा विस्तार
ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही गेल्या ४२ वर्षांपासून जिल्ह्यातील आर्थिक विकासाची भक्कम पायाभरणी करणारी अग्रगण्य संस्था म्हणून कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता, पारदर्शकता व ग्राहकाभिमुख सेवा या तत्त्वांवर आधारित वाटचाल करत बँकेने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
गेल्या ४२ वर्षांच्या कालावधीत बँकेने ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल सेवा तसेच ग्राहकांना सुलभ व तत्पर सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे.
दि. १३ जानेवारी २०२२ रोजी बँकेच्या नव्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर मा. अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. गेल्या पाच वर्षांत बँकेने आर्थिक वाढीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतल्यास दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी बँकेचा एकूण व्यवसाय ₹४२७७.६६ कोटींवरून आज ₹७१७६.२१ कोटींवर पोहोचला आहे. ठेवी ₹२२६३.३० कोटींवरून ₹३९४२.५७ कोटींपर्यंत वाढल्या असून, कर्ज वितरण ₹२०१४.३६ कोटींवरून ₹३२३३.६४ कोटींवर गेले आहे. निव्वळ नफा ₹१६.०० कोटींवरून ₹५०.०० कोटींपर्यंत वाढला आहे. एकूणच ठेवी, कर्ज व व्यवसायामध्ये गेल्या चार वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
ही वाढ बँकेच्या सुदृढ धोरणांची अंमलबजावणी व सुयोग्य नियोजनामुळे साध्य झाली असून, बँकेला सातत्याने “अ” दर्जा मिळत आहे. बँकेने शेतकरी, उद्योजक, कारागीर, युवक व महिला यांना केंद्रस्थानी ठेवून विविध कर्ज व विकास योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच शिक्षणासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डिजिटल बँकिंग क्षेत्रात बँकेने मोठी झेप घेत १८ शाखा व ४२ एटीएम केंद्रांच्या माध्यमातून आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी “बँक सखी” योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, महिलांना गावपातळीवरच बँकिंग सेवा मिळत आहे.
तसेच प्राथमिक विकास संस्थांच्या बळकटीकरणासाठी व संगणकीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध आर्थिक प्रोत्साहन योजना राबविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एकूणच ग्राहकांचा वाढता विश्वास, पारदर्शक सेवा आणि विविध कर्ज योजनांमुळे बँकेने आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया निर्माण केला आहे. बँकेच्या व्यवसायातील वाढ ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, स्थैर्य, विश्वासार्हता आणि प्रगतशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
या यशाचे श्रेय बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक वर्ग, संचालक मंडळातील सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देत बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी भविष्यातही ही प्रगती अधिक गतिमान ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
