मसुरे / (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस येथील जल मंदिरात चित्रीत करण्यात आलेले “आई तू सातेरी माऊली गं” हे मराठी गोंधळ गीत नुकतेच रिलीज झाले आहे. सुमारे साडेसात मिनिटांच्या या व्हिडिओ सॉन्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड तालुक्यातील विविध कलाकारांचा सहभाग आहे.
या गाण्यात नागकन्या (आई सातेरी देवी) ची भूमिका कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी हिने साकारली असून, आजीची भूमिका आशालता लवू तोंडवळकर (वेर्ली) यांनी केली आहे. या गाण्याची संपूर्ण कोरिओग्राफी कुडाळ येथील प्रसिद्ध कोरिओग्राफर व पी. के. डान्सचे संस्थापक प्रसाद कमतनूरे यांनी केली आहे.
या व्हिडिओ सॉन्गमध्ये बिळवस येथील सातेरी देवीची प्रचिती आणि तिची भक्तांवरील कृपा अत्यंत सुंदर कथानकातून मांडण्यात आली आहे. कथेनुसार, एक वृद्ध आजी रात्रीच्या वेळी सातेरी मंदिरात जात असताना अंधारामुळे वाट चुकते. त्यावेळी एक लहान मुलगी तिचा हात धरून तिला मंदिरात पोहोचवते. मात्र मंदिरात पोहोचल्यावर ती मुलगी अचानक गायब होते. त्यावेळी आजीला जाणवते की, ती मुलगी म्हणजेच सातेरी देवी होती, जिने तिला योग्य मार्ग दाखवला.
या गाण्यात अमोल सावंत, गणेश कुंभार, चैताली पालव, हर्षाली पालव यांसह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या असून, डान्सर आणि बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणूनही स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग आहे.
या गाण्याचे दिग्दर्शक, निर्माता, प्रोडक्शन मॅनेजर व कास्टिंग डायरेक्टर म्हणून प्रकाश सदानंद पालव यांनी काम पाहिले असून, सहनिर्माते म्हणून प्रशांत पालव (बिळवस, मालवण) यांनी योगदान दिले आहे.
