You are currently viewing कुडाळजवळ पिंगुळी येथे भीषण अपघात

कुडाळजवळ पिंगुळी येथे भीषण अपघात

कुडाळजवळ पिंगुळी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी

डंपरची जोरदार धडक; जखमी रेलिंगवरून उडून समोरच्या गाडीवर आदळले, एकाची प्रकृती चिंताजनक

कुडाळ

मुंबई–गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोघे कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. पिंगुळी गुढीपूर परिसरात आले असता मागून येणाऱ्या डंपर चालकाने मुख्य रस्त्यावरून सर्विस रोडकडे वळण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरची दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली.
या धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघेही हवेत उंच उडाले. ते महामार्गालगतच्या रेलिंगवरून पुढे जाऊन समोरून येणाऱ्या वाहनाच्या बोनेटवर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून एका जखमीच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा