You are currently viewing देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई
Oplus_16908288

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई

रत्नागिरीतील ‘भुवनेश्वरी’ नौका जप्त; सर्जेकोट बंदरात आणून कारवाईची प्रक्रिया सुरू

मालवण / प्रतिनिधी :

मालवण तालुक्यातील देवबाग समोरील सागरी क्षेत्रात एलईडी लाईट्सचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘भुवनेश्वरी’ (IND MH 4 MM 3738) या मासेमारी नौकेला जप्त करून सर्जेकोट बंदरात आणण्यात आले आहे.

३० मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मत्स्य विभागाचे गस्ती पथक देवबाग-मालवण सागरी हद्दीत गस्त घालत असताना ही नौका एलईडी लाईट्सचा प्रकाशझोत लावून मासेमारी करताना आढळली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अंदाजे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर ही अवैध मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.

सदर नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नौकेचे मालक महेश मनोहर आयरे (शिरगाव, रत्नागिरी) असून नौकेवर तांडेलसह दोन खलाशी होते.

ही कारवाई परवाना व अंमलबजावणी अधिकारी, मालवण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जप्त करण्यात आलेली नौका सध्या सर्जेकोट मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली असून प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती मत्स्य विभागाने दिली.

या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर, सावजी यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडून एलईडी लाईट्स वापरून होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वीही अनेक नौका जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पुढेही अशा अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा