जमिनीच्या वादातून सावंतवाडीत थरारक खून; महिलेवर कोयत्याने वार, दोघे ताब्यात
सावंतवाडी
तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली. सरस्वती धोंडी सावंत असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती सावंत यांचा त्यांच्या दीर विजय कृष्णा सावंत यांच्याशी जमीन-जागेच्या कारणावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. आज सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास या वादाचे रूपांतर तीव्र मारहाणीत झाले. यावेळी विजय सावंत (वय ६५) व त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३५) यांनी संतापाच्या भरात सरस्वती सावंत यांच्या मानेवर कोयत्याने वार केला.
या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिका व सावंतवाडी पोलिसांना पाचारण केले. जखमी अवस्थेत त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित विजय सावंत व रघुनाथ सावंत या दोघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मृत महिलेचे पुत्र एकनाथ सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
