You are currently viewing गुलमोहोर…

गुलमोहोर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलमोहोर….*

 

जेव्हा कुणी फुलत नाही गुलमोहर मोहरतो

रखरखत्या त्या तप्त रानी पानोपानी झुलतो

 

पळसपांगाऱ्याची त्याला भडक लाल ती साथ

वाऱ्यावरती डुलती पहा ना सारे मस्त उन्हात

 

गुलमोहराची फुलेच फक्त पान एक न दिसते

लाल केशरी भडक कुंकुम नजर वेधूनी घेते..

 

भला थोरला गुच्छ फुलांचा अवकाशी तो डुलतो

उन्हात सुद्धा सुखी रहावे मानवास शिकवितो..

 

तप्त झळा मी पहा झेलतो तरी मनोहर आहे

नेत्रसुख नि तुम्हा सावली व्रत हे माझे राहे..

 

देता देता मनास शांती सुख देण्याचे कित्ती

जरी तापलो उन्हात किती ही आनंदी माझी वृत्ती..

 

सडा घालतो अवनी वरती करतो पुजा तिची

धरून ठेवते माता मजला घट्ट मुळे, जमिनीची..

 

पालनपोषण करते वसुधा सौंदर्यास मी जपतो

ग्रीष्म झेलतो अंगावरती पानोपानी बहरतो…

 

कर्म करावे कृष्ण सांगती येता वसुधेवरती

सेवाव्रती मी आहे पुरता देणेच माझी नीति..

 

तप्तझळांना अनिला सोबत झुगारून मी देतो

लालगुलाबी मस्त शेंदरी रूपात पुढ्यात येतो..

 

मला पाहूनी आनंदी ती समस्त जनता होते

युगायुगाचे प्रेमाचे हो आहे आपले नाते..,

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा