You are currently viewing सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ उत्साहात; शतायु ग्रंथालयांचा गौरव

सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५ उत्साहात; शतायु ग्रंथालयांचा गौरव

कुडाळ येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवात वाचन चळवळीला चालना; पुढील वर्षी ५० वर्ष पूर्ण ग्रंथालयांचाही सन्मान होणार

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. २७ व २८ मार्च रोजी कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉल येथे झालेल्या या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप जिल्ह्यातील जवळपास दहा शतायु ग्रंथालयांचा सन्मान करून करण्यात आला.

या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी ग्रंथालय चळवळीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात शतकाहून अधिक काळ ग्रंथालय चळवळ जोपासली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार आणि वाचकांच्या आवडीनिवडीनुसार ग्रंथालयांनी स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित करण्यासाठी ग्रंथपालांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी आवाहन केले.

या ग्रंथोत्सवात कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी वाचनालय, सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर, वेंगुर्ले नगर वाचनालय, शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय, होडावडे श्रीराम वाचनालय, बांदा नट वाचनालय, मालवण नगर वाचनालय, आचरा श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, भरड शिवाजी वाचन मंदिर (मालवण), वाडे-देवगड येथील सौ. मालती जनार्दन जोशी मोफत वाचनालय तसेच डॉ. वि. वा. नेने ग्रंथालय या शतायु ग्रंथालयांचा सन्मान करण्यात आला. संस्थाचालक व कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

समारोपप्रसंगी बोलताना सचिन हजारे यांनी ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृती वाढीसाठी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. “ग्रंथालये चांगले काम करत आहेत, परंतु वाचकांना आकर्षित करण्यासाठी नवे उपक्रम राबविणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात मंगेश मस्के यांनी पुढील वर्षी ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमात राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य, रमेश बोंद्रे तसेच अरविंद शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. “शतायु ग्रंथालयांचा सन्मान हा वाचन चळवळीला बळ देणारा उपक्रम आहे,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

“वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथालयांची भूमिका” या विषयावर झालेल्या चर्चासत्रात संजय शिंदे, पूनम नाईक, अक्षता सावंत व सिद्धेश राऊळ यांनी ग्रंथपालांनी आधुनिक बदल स्वीकारत वाचकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा पाटणकर यांनी केले. ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा