You are currently viewing सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाचे २५० व्या वादनासाठी मध्यप्रदेशकडे प्रस्थान

सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाचे २५० व्या वादनासाठी मध्यप्रदेशकडे प्रस्थान

सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाचे २५० व्या वादनासाठी मध्यप्रदेशकडे प्रस्थान

कणकवली
एन.बी.एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील सिंधुगर्जना ढोल-ताशा पथक रामनवमीनिमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे २७ मार्च रोजी २५० वे वादन करण्यासाठी रवाना होणार आहे. आपल्या दमदार आणि पारंपरिक वादनशैलीमुळे सिंधुगर्जना पथकाने राज्यासह देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यापूर्वी या पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या वादनाने ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त द्वारका (दिल्ली) येथे पंतप्रधान कार्यालयाच्या निमंत्रणावरून वादन करण्याचा मानही या पथकाला मिळाला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-गोवा आणि २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन परेडसारख्या मानाच्या कार्यक्रमांमध्येही सिंधुगर्जना पथकाने विशेष आमंत्रित म्हणून सहभाग नोंदविला आहे.
सिंधुगर्जना पथकाने २०२४ मध्ये १००० वाद्यांसह अखंड वादन करत विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढविणाऱ्या या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सुमारे ६० स्त्री-पुरुष कलाकारांचा संच असलेले सिंधुगर्जना पथक मध्यप्रदेशमध्ये जाऊन आपले कौशल्य सादर करणार असून, त्यांच्या या २५० व्या वादनाबद्दल जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा