You are currently viewing संजू परब यांच्यावर साक्षी वंजारी यांचा घणाघात; “निलेश राणे यांच्या पाठबळावरच अस्तित्व”

संजू परब यांच्यावर साक्षी वंजारी यांचा घणाघात; “निलेश राणे यांच्या पाठबळावरच अस्तित्व”

केसरकरांवरील टीका, सावंतवाडीतील राजकारण आणि शिंदे शिवसेनेच्या कामगिरीवरून काँग्रेसचा जोरदार पलटवार

सावंतवाडी :

सावंतवाडीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. परब यांचे राजकीय अस्तित्व हे केवळ निलेश राणे यांच्या पाठबळावर उभे असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

परब यांनी केलेल्या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे सांगतानाच, त्यांना राजकीय वास्तवाची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले. विरोधकांवर आरोप करताना स्वतःच्या भूमिकेचा विसर पडू नये, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.

दीपक केसरकर यांच्यावर यापूर्वी परब यांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण करून देत वंजारी म्हणाल्या की, विरोधी पक्ष राजकारण करतो असा आरोप करणे हा केवळ दिखावा असून प्रत्यक्षात परब स्वतःच सोयीप्रमाणे राजकारण करत आहेत. केसरकरांवर खालच्या स्तरावर टीका करणारे परब आज नैतिकतेची भाषा करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

नगराध्यक्ष पदावर निवडून येताना परब यांना कोणाचे आशीर्वाद लाभले आणि त्यांचे वैयक्तिक कर्तृत्व काय, असा सवाल उपस्थित करत वंजारी यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांवरही निशाणा साधला. केवळ मतांच्या जोरावर सत्ता मिळवणे म्हणजे समाजकारण नव्हे, तर त्यापलीकडे जबाबदारी असते, असे त्यांनी ठासून सांगितले.

काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देताना त्यांनी विलासराव देशमुख यांचे उदाहरण दिले. आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती, हीच काँग्रेसची परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, केसरकर हे विधिमंडळ डिसिप्लिनरी कमिटीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून चौकशीला सामोरे जावे, अशी अपेक्षा वंजारी यांनी व्यक्त केली. ही भूमिका वैयक्तिक नसून सार्वजनिक हिताची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी व वेंगुर्ला येथील शिंदे शिवसेनेच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत स्थानिक पातळीवरील राजकीय वास्तव मांडले. सावंतवाडी नगरपरिषदेत मर्यादित नगरसेवक, वेंगुर्ल्यात अपयश आणि जिल्हा परिषदेत कमी प्रतिनिधित्व हेच त्यांच्या कार्याचे वास्तव असल्याची टीका त्यांनी केली.

महायुती असूनही भाजप व स्थानिक नागरिकांमध्ये परब यांच्याविरोधात असलेली नाराजी अधोरेखित करत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक टीका करण्यापेक्षा परिस्थितीचा विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

शेवटी, “सावंतवाडीतील जनता सर्व काही जाणते. खोटं जास्त काळ टिकत नाही,” असे स्पष्ट करत साक्षी वंजारी यांनी संजू परब यांनी पुढे जबाबदारीने आणि विचारपूर्वक वक्तव्य करावे, असा राजकीय इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा