कोंडये येथे २ टन काजू बी चोरी; तब्बल ३.२० लाखांचा ऐवज लंपास
शेतमांगराचे कुलूप तोडून चोरट्यांचा डाव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू
कणकवली,
तालुक्यात घरफोडीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी काजू बागांकडे आपले लक्ष्य वळविल्याचे समोर आले आहे. कोंडये वरचीवाडी येथे तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन टन काजू बी चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर (वय ७६) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची कोंडये येथे चिरेबंदी, पत्र्याची शेतमांगर असून परिसरात सुमारे एक हजार काजू कलमांची झाडे आहेत. २२ मार्च रोजी सकाळी त्यांनी काजू बागेतील काजू काढून शेतमांगरामध्ये साठवून ठेवले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांनी काढलेली काजू बी तसेच इतर कृषी साहित्य सुरक्षित ठेवून ते घरी परतले.
मात्र २३ मार्च रोजी सकाळी शेतमांगराकडे गेले असता कुलूप तोडलेले दिसून आले. तसेच परिसरात काजू बी अस्ताव्यस्त पडलेली आढळली. पाहणी केली असता शेतमांगरामध्ये साठवून ठेवलेली सुमारे २ टन काजू बी, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले.
या घटनेमुळे परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
