You are currently viewing संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी एक आदर्श व्यक्तिमत्व 

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी एक आदर्श व्यक्तिमत्व 

 

आज महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे कार्यरत असणारे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र शासनाने श्री दिलीप स्वामी यांनी राबविलेल्या तीन योजनांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचे आदेश दिलेले आहेत.इतके त्यांचे कार्य समाजाभिमुख आहे. 25 मार्च हा त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा आढावा.

श्री दिलीप स्वामी यांची माझी भेट अमरावतीला झाली. ते त्यांचे मित्र श्री अविनाश हदगल व श्री संजय सरवदे हे तिघेही अमरावती येथे प्रोबेशनवर उपजिल्हाधिकारी म्हणून आले होते. अमरावतीच्या कांतानगर परिसरात ते तिघेही शासकीय निवासस्थानात राहत होते.

त्यांचा माझा परिचय झाला आणि परिचयाचे रूपांतर जिवलग मैत्रीमध्ये झाले. साहेब अमरावती नांदेड बुलढाणा सोलापूर आणि आता संभाजीनगर येथे बदलून गेले परंतु आमचा स्नेह दिवसेंदिवस वाढतच गेला आणि आज तो घट्ट मैत्रीमध्ये रूपांतरित झालेला आहे.

एक तत्पर तेजस्वी व तपस्वी अधिकारी म्हणून श्री दिलीप स्वामी यांचा उल्लेख करावा लागेल. जिथे जिथे त्यांनी उपजिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम केले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यशैलीमुळे आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. तो इतका की महाराष्ट्र शासनाला त्याची दखल घेऊन त्यांचे उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या अभ्यासिकेचे व ग्रंथालयाचे उद्घाटन श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले. मिशन आयेच्या सर्वच उपक्रमामध्ये श्री दिलीप स्वामी आवर्जून उपस्थित राहायचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहायचे. कार्यक्रम लहान असो की मोठा अमरावतीला असताना दिलीप स्वामी आमच्या कार्यक्रमाला आले नाहीत असे कधी झाले नाही.

सोलापूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी जिल्हा परिषद शाळांसाठी जो अभिनव उपक्रम राबविला त्या उपक्रमाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली व तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी असे उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले पाहिजेत यासाठी पाठपुरावा केला.

अमरावतीला साहेब उपविभागीय अधिकारी होते. मे जून महिना असावा. मुलांचे जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले रहिवाशाचे दाखले या शैक्षणिक वर्षात द्यावे लागतात. दिलीप स्वामी साहेब स्वतः ते काम करीत होते. पण काम खूपच वाढले .तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आणि एक सहकारी उपजिल्हाधिकारी देण्याची विनंती केली. अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांनी ती मान्य केली. पण नवीन आलेले अधिकारी रोजचे काम रोज करीत नव्हते. त्यांना विलंब लागत होता. काही लोकांनी स्वामी साहेबांच्या हे लक्षात आणून दिले. शैक्षणिक वर्ष किती महत्त्वाचे असते याची जाणीव स्वामी साहेबांना होती त्यामुळे त्यांनी सर्वच दाखले स्वतःच्या सहीने देण्याचा सपाटा लावला. कधी कधी तर झोपायला वेळही अपुरा पडायचा. पण माझ्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला.

श्री दिलीप स्वामी आणि अमरावती हे समीकरण आता कायम स्वरूपाचे झाले आहे. अमरावतीत असतांना त्यांचा मोठा मित्रांचा गोतावळा तयार झाला. अनेक संस्थांची त्यांचे नाते कायमचे जोडले गेले. त्यामुळे साहेब आता कुठेही असो .अमरावतीला गझल संमेलन असो साहित्य संमेलन असो की एखादा मोठा कार्यक्रम असो आम्ही त्यांना अमरावतीला बोलवल्याशिवाय राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहेब आमचे निमंत्रण टाळतही नाहीत.

संभाजी नगरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात विविध अभिनव उपक्रम राबविणे सुरू केले. त्यांनी राबविलेल्या दोन उपक्रमांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि हे उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात राबवावे असे परिपत्रक काढले

एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने केलेल्या कार्याला महाराष्ट्र शासनाने तीन वेळा संपूर्ण महाराष्ट्रात उपक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगणे मला वाटते ही प्रशासनातील फार महत्त्वाची व नोंदणीय बाब आहे.

साहेब तसे लातूर जिल्ह्यातील. परभणीच्या कृषी विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व लगेचच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे रुजू झाले. आजपर्यंतची त्यांची कार्यकीर्द ही प्रत्येक ठिकाणी मैलाचा दगड ठरलेली आहे आणि भविष्यातही ठरणार आहे.

या लेखांमध्ये सौ.वहिनी साहेबांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण करता येणार नाही. सौ वहिनीसाहेबांची खंबीर साथ त्यांना मिळाली म्हणून साहेब प्रशासकीय कामाला भरपूर वेळ देऊ शकले. घरची सगळी बाजू सौ वहिनीसाहेबांनी सांभाळली त्यामुळे साहेब प्रशासनामध्ये राज्यस्तरीय प्रगती करू शकले.

साहेबांना सामाजिक साहित्य सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यामध्ये मनापासून आवड आहे. इलाही जमादार हे त्यांचे आवडते गझलकार. साहेब अमरावतीला असताना इलाही जमादार यांच्या फेऱ्या अमरावतीला नियमित व्हायच्या. साहेबाच्याच पुढाकाराने अमरावतीला शोध मराठी मनाचा हा जागतिक मराठी संमेलनाचा कार्यक्रम व श्री भीमराव पांचाळे यांचे मराठी गझल साहित्य संमेलन अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संपन्न झाले. या दोन्ही कार्यक्रमात साहेब अधिकारी म्हणून वावरले नाहीत तर त्यांची भूमिका ही कार्यकर्त्याची होती.

त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे ते आज फार मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख झालेले आहेत. लोकांच्या समस्या ऐकून घेणे व त्यावर तात्काळ निर्णय घेणे हे कसब साहेबांना गवसले आहे. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत आहे. अशा आमच्या प्रिय अशा श्री दिलीप स्वामी साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा