You are currently viewing गझलकारी:— जयराम धोंगडे

गझलकारी:— जयराम धोंगडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांनी गझलकार जयराम धोंगडे यांच्या “गझलकारी” गझल संग्रहाचे केलेले परीक्षण*

 

*गझलकारी:— जयराम धोंगडे*

*^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^*

 

चित्रकारी, मिनाकारी, शिल्पकारी तशीच गझलेतल्या शेरांमध्ये अदाकारी दाखवून जबरदस्त शेरांची गझल म्हणजेच ‘गझलकारी’.

गझलकारने स्वतःचे कौशल्य व मराठी भाषेवरच्या प्रभुत्वाने गझलेची ‘गझलकारी’ हा संग्रह २५ नोव्हेंबर २०२४ ला स्वयंप्रकाशित केला आहे. मुखपष्ठ अप्रतिम असल्याने संग्रह खूपच आकर्षक झाला आहे. पाहताक्षणीच वाचकाचे लक्ष वेधून घेतो. आतला ऐवज, म्हणजेच गझलकारची लेखन शैली, खरेच कौतुकास्पद आहे. प्रत्येक गझल नि शेरांची फेक जबरदस्तच आहे. संग्रहाला ‘गझलकारी’ हे शीर्षक अतिशय साजेसे आहे.

 

या संग्रहात एकूण पंच्याहत्तर गझला समाविष्ट केल्या आहेत. अक्षरगण मात्रा वृत्ते, अन् छोट्या -मोठ्या बहराची वृत्ते गझलकारने हाताळली आहेत.

गझलेचे खयाल सुंदर नि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यावरून गझलकारचा समाजाकडे बघण्याचा चौकस दृष्टीकोन दिसून येतो.

आजच्या समाजाचे वास्तव दर्शन घडवणारा त्यांचा स्त्रग्विणी वृत्तातला शेर पहा :-

 

*पिरपिरी तर कधी ढग फुटी पाहतो*

*चिंब ओली उभी मी कुटी पाहतो*

अन् मात्रा वृत्तातला :-

 

*कोंब कोवळे सडेपर्यंत कोसळल्यावर*

*आडमुठ्या पाऊस शेवटी भोळा होतो*

 

आज माणूसच माणसाचा वैरी होत चाललाय‌. आनंदकंद वृत्तातला मतला बघा :-

 

*जाणे पुढे कुणाचे ना पाहवत कुणाला*

*मोठेपणा कुणाचा ना आवडत कुणाला*

 

मुलगी नको, मुलगाच हवा‌ असे धोरण ठेवणाऱ्या समाजाचे डोळे उघडणारा आनंदकंद वृत्तातला शेर :-

 

*जनमान्य धारणा की मुलगाच वंशदीपक*

*मुलगीच वात असते नाही कळत कुणाला‌!*

 

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारा शेर,

*आपण दोघे दोन आपले सुखात राहू*

*परिवाराची भागीदारी नको वाटते!*

 

पर्यावरण संतुलन राखणे किती जरुरी हे सांगणारा हा शेर :-

 

*झाड व्हावे सावलीचे अंगणी*

*वाटते तर लाव काही रोपटी!*

माणसाच्या विसंगती वर नेमके भाष्य करणारा व्योमगंगा वृत्तातला शेर :-

 

*चार पैसे उसनवारी जर दिले मी अडचणीला*

*तो समजतो दान त्याला मागताही येत नाही!*

 

गझलकारची अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांने स्वतःला दुखणाऱ्या किंवा सुखावणाऱ्या गोष्टी प्रभावीपणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गझलेत मांडल्या आहेत. कसे ते पहा :-

 

*साधासुधा तसा मी साधे विचार माझे*

*पटल्यास घेत जावे, मी साधुसंत नाही!*

 

तसेच स्पष्ट मत मांडणारा :-

*देऊ नकोस खांदा माझ्या कलेवराला*

*पुन्हा कुडीत माझा येईल प्राण मित्रा!*

 

‘कोडे’ या आनंदकंद वृत्तात गझलकार समाजाच्या वागणुकीवर प्रकाशझोत टाकत आह

*होतो जिवंत तेंव्हा ना ऐकली प्रशंसा*

*मेल्यावरी जगाने सानंद टाळ कुटले.*

जिवंत असताना कुणी प्रशंसा करायला उत्सुक नसतात पण मेल्यावर मात्र त्या माणसाचे गुण गात असतात.

 

शांत समजुतदार वृत्तीने वागणारा गझलकार बघा :-

*नाही पटले की थोडा, खेदाने व्याकुळतो मी*

*चुकतो माणूसच कळते अन् मी रागवत नाही.*

 

आजच्या समाजात कसे वावरायचे हे गझलकारास चांगले ज्ञात आहे.

 

*मी एवढ्या खुबीने शिकलो हसायला की*

*माझे उदास हसणे नाही कळत कुणाला*

 

आपली सरसकट नाते बंधन सुरळीत नि छान ठेवण्यासाठी गझलकारचा समजुतदारपणा बघा:-

*वाद सारे टाळल्यावर*

*सांगतो फुलतील नाती*

 

पायी वारी करून विठ्ठलास भेटण्यास जाणे गझलकारच्या दृष्टीने तेवढे काही महत्त्वाचे वाटत नाही कारण त्याच्या हृदयात कायम असलेल्या श्री विठ्ठलास ते वेळोवेळी भेटतच असतात.

*विठ्ठलास मी भेटत जातो वेळोवेळी*

*भेटीसाठी पायी वारी नको वाटते*

 

गझलकार अतिशय शांत प्रवृत्तीचा आहे हे खालील शेरा वरून समजते :-

*बोलो कुणी कसेही ऐकून घेतले पण*

*शब्दास लावली मी केव्हाच धार नाही*

 

दैव, नशीब म्हणून स्वस्थ बसून राहणे गजलकारला पसंत नाही. ‘अपना हात जगन्नाथ’ ह्या तत्त्वानुसार हिंमत दाखवणे ते मान्य करतात :-

*भाग्य आपले सटवी लिहिते म्हणती सारे लिहो बापुडी*

*जे लिहिले ते भाग्यामधले कर्तृत्वाने खोडत जाऊ*

 

असेच मनाला भिडणारे मला आवडलेले गझलकारचे अजून शेर बघा :-

*जीव लावाया हवी भगिनी अशी*

*ती असू दे थोरली वा धाकटी*

 

*पाडल्या गर्भातल्या जर का मुली*

*सावळी मिळणे न गोरीगोमटी*

 

*मतभेद मान्य आहे मनभेद तो नसावा,*

*जयराम सांगतो तर मित्रा जुळवून घे ना!*

 

*शेवटी माणसा एकटे जायचे,*

*जमवतो का धन लोचटासारखा?*

 

*तेल आहे अन् दिवा ही,*

*पेटवाया वात नाही*

 

*जीव लावा एवढा कोणावरी की*

*पुस्तकी त्या आपलेही पान राहो,*

 

*काळजाचा काढला फोटो*

*अन् कळाले वाढला मत्सर*

 

*कुठे यायचे जन्मा अन् कधी जायचे वरती*

*हाती नाही अरे माणसा अपुल्या जाणे येणे*

 

*चेहऱ्यामागचा चेहरा ओळखा,*

*घातकी ना कुणी माणसा सारखा*

 

*आली गेली किती संकटे मी घाबरलो नाही*

*लढलो पडलो उठलो झटलो पण मी हरलो नाही*

*दु:खाला मी थांब म्हणालो*

*रहा जरासा लांब म्हणालो*

 

अशा अप्रतिम शेरांनी सजलेल्या गझला आपणास ‘गझलकारी’ मध्ये वाचायला मिळतिल. या संग्रहास प्रख्यात गझलकार, डॉ. शिवाजी काळे सरांनी, अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली आहे.

 

*समीक्षण*:-

शोभा वागळे

पुणे.

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा