जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा…
सिंधुदुर्गात पर्यटन हंगामामुळे वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजनाचे निर्देश…
सिंधुदुर्गनगरी
पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील इंधन साठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील एकही पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करत पेट्रोल पंप चालक व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय ठेवून काम करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्यांचे सेल्स अधिकारी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंप डीलर्स यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठ्याचा सविस्तर आढावा घेऊन उपलब्धतेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रशासन पूर्णपणे सोबत असल्याचा विश्वास देत, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना इंधनाअभावी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
