प्रमोद कामत यांच्या हस्ते उद्घाटन; तांत्रिक स्पर्धा, रोबो रेस व ऑटो शोने रंगणार दोन दिवसांचा
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या उद्घाटन सोहळ्यास भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले तसेच समन्वयक प्रा. सिद्धेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक गरजांचा विचार करून तंत्रज्ञानाचा विकासासाठी कसा प्रभावी वापर करता येईल, यावर या महोत्सवाचा मुख्य भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळते, असे नमूद करत पुढील काळातही अशा उपक्रमांची मालिका राबविण्याचा मानस व्यक्त केला. कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी आयोजन समितीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना या महोत्सवातून नवसंकल्पनांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे प्रमोद कामत यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञान हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य साधन असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी अशा उपक्रमांना जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
महोत्सवात टेक्निकल क्विझ, रोबो रेस, प्रोजेक्ट स्पर्धा, डिबेट आणि रील मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे परिसरात स्पर्धात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सत्रात मेगा ऑटो शोचे आयोजन करण्यात येणार असून स्पीड, पॉवर आणि स्टाईलचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शृंखला नाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश सावंत यांनी केले.
दोन दिवस चालणारा हा तांत्रिक महाउत्सव विद्यार्थ्यांच्या कल्पकता, कौशल्य आणि नवसंकल्पनांना नवी दिशा देणारा ठरणार असून विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन संस्था तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. ‘क्वांटेक्झेरा २०२६’ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांत्रिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
