You are currently viewing सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण कौस्तुभ  पेडणेकरची दमदार कामगिरी

सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण कौस्तुभ  पेडणेकरची दमदार कामगिरी

सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण कौस्तुभ  पेडणेकरची दमदार कामगिरी

वुमन इंटरनॅशनल मास्टर पर्णाली धारीयावर विजय; सात पैकी सात राऊंड जिंकत २४वा क्रमांक

सावंतवाडी

नेरुळ, नवी मुंबई येथे आयोजित सातव्या ताराबाई शिंदे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आघाडीचा खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत २४वा क्रमांक मिळवला. आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातून सुमारे ५२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सावंतवाडीतील मुक्ताई अकॅडमीचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू असलेल्या बाळकृष्णसोबत राजेश विरनोडकर यानेही स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट खेळ सादर केला. बाळकृष्णला रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बाळकृष्णने वुमन इंटरनॅशनल मास्टर पर्णाली धारीया हिला पराभूत करत नोंदवलेला थरारक विजय. चुरशीच्या या सामन्यात त्याने एशियन गोल्ड मेडलिस्ट पर्णालीला कोणतीही संधी दिली नाही. या कामगिरीमुळे इंटरनॅशनल स्तरावरील खेळाडूवर विजय मिळवणारा तो कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे.
बाळकृष्णने एकूण नऊ फेऱ्यांपैकी सात सामने जिंकत सात गुणांची कमाई केली असून त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ३७ गुणांची वाढ झाली आहे. तर राजेश विरनोडकरच्या रेटिंगमध्ये १६ गुणांची भर पडली.
स्पर्धेनंतर पर्णाली धारीया तसेच तिचे पती, नॅशनल मास्टर आणि ‘चेस असिस्ट’चे संस्थापक साहिल टिक्कू यांनी बाळकृष्णच्या खेळाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी ‘चेसबेस इंडिया’चे संस्थापक सागर शहा यांनीही त्याच्या कामगिरीची दखल घेतली होती.
मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्णने हे यश संपादन केले असून, सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा