You are currently viewing
Oplus_16908288

देवगड तालुक्यातील पडेल ते पडेल रत्नागिरी सागरी मार्गालगत गुरव घरापासून सौंदाळे सडा भागात चार ते पाच किलोमीटर परिसरात दोनशे एकर क्षेत्रातील हापूस आंबा कलमांना आगीची झळ बसल्याने या वनव्यात २०० ते २५० पेक्षा जास्त आंबा कलमे होरपळून २५ हून अधिक आंबा बागातदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.०० च्या सुमारास घडली. आग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र ही आग दुसऱ्या दिवशी पुन्हा पसरली.

या वनव्यात सौंदाळे गावातील सुमारे २५ हून अधिक आंबा बागायतदारांच्या कलमबागांना झळ बसली आहे. अनेक हापूस आंब्याची झाडे तसेच त्यावरील लागलेली फळे आगीत भाजून नष्ट झाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा आधीच हापूस आंब्याचे उत्पादन केवळ १० टक्क्यांपर्यंत मर्यादित असताना या वनव्यामुळे बागायतदारांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या घटनेची माहिती देताना सौंदाळे गावच्या सरपंच सौ. मनाली कामतेकर मेरवणकर, उपसरपंच विष्णू राणे तसेच ग्रामस्थ जगन्नाथ गुरव यांनी प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा