नगरसेवक देव्या सूर्याजी यांची सावंतवाडीत आयुष ओपीडी सुरू करण्याची मागणी
धारगळ (गोवा) येथे जाणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेकडे जागेची मागणी
सावंतवाडी
गोव्यातील धारगळ येथील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान’ (आयुष) रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना होणारी प्रवासाची गैरसोय लक्षात घेता, सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीमध्ये या रुग्णालयाची ओपीडी तसेच औषध साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी निवेदन सादर केले असून, प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.
धारगळ येथील आयुष रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी जात असून, उपचारांचा चांगला परिणाम होत असल्याने रुग्णांचा ओघ वाढत आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातून गोव्यापर्यंतचा प्रवास हा खर्चिक व त्रासदायक ठरत आहे.
जर सावंतवाडी शहरात ही ओपीडी सेवा सुरू झाली, तर जिल्ह्यातील हजारो रुग्णांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. केंद्र शासनाकडून या केंद्रासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या असून, नियमानुसार हे केंद्र शासकीय जागेत सुरू करणे आवश्यक आहे.
नगरपालिकेने आपल्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास सिंधुदुर्गातील रुग्णांना अत्याधुनिक आयुर्वेदिक उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होऊ शकतील, असे देव्या सुर्याजी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या वेळी संघटनेचे सहसचिव ॲड. वसंत सावंत, ॲड. प्रथमेश प्रभू, मंदार सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
