You are currently viewing नुकसानभरपाईच्या मागणीसाठी नांदगावात रास्ता रोको

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी नांदगावात रास्ता रोको

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी नांदगावात रास्ता रोको; आंदोलनाची दिशा बदलत पर्यायी मार्गही रोखण्याचा इशारा

सिंधुदुर्ग :

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी एकत्र जमले होते.
या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक, उत्तम लोके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सहभागी झाले होते. आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलकांच्या हातात शहीद भगतसिंग यांचे फोटोही पाहायला मिळाले.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वळवून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे सुरुवातीला वाहतुकीवर अपेक्षित परिणाम जाणवत नव्हता.
मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात सविनय कायदेभंगाचे आवाहन करत आंदोलकांना पर्यायी मार्गही रोखण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आंदोलनाची दिशा बदलत आंदोलक हुमरटच्या दिशेने निघाले असून, परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा