राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; वैभव नाईक, संदेश पारकरांसह शेकडो शेतकरी सहभागी
कणकवली (प्रतिनिधी) :
आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच आंबा-काजूला हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी नांदगाव तिठा येथे एकवटले असून त्यांनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून दुपारी ११.१० वाजता महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्याने महामार्ग काही काळ बंद झाला आहे.
“जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उठणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच “आंबा-काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा,” अशा जोरदार घोषणा देत आंदोलन तीव्र करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, आंबा उत्पादक संघाचे काका ढोके, उत्तम लोके, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संदेश गावडे, तसेच गणेश गावकर, किरण टेंबुलकर, प्रशांत शिंदे, गणेश वाळके, राजू वाळके, तेजस मामवाडी, चंदन मामवाडी, विश्वास भुजबळ, राजेंद्र पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
