You are currently viewing आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी आंदोलन

आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी आंदोलन

आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी आंदोलन; पोलिसांनी दिली स्थगितीची सूचना

नांदगाव येथे रास्तारोकोची तयारी; प्रशासन सतर्क
शेतकरी आंदोलनाआधीच पोलिसांचा इशारा

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना यंदा वातावरणातील बदलामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच विविध मागण्यांसाठी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढोके यांच्या नेतृत्वाखाली, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२३ मार्च) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथील प्रीनफिल्ड हॉटेल परिसरात रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी माजी आमदार वैभव नाईक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या नोटीसीत नमूद केले आहे की, जिल्ह्यात २० मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ अंतर्गत मनाई आदेश लागू आहे. त्यामुळे या कालावधीत कोणतेही आंदोलन केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच आंदोलनादरम्यान शासकीय किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान, आक्षेपार्ह घोषणा किंवा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे सार्वजनिक शांतता भंग झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या नोटीसीमुळे प्रस्तावित आंदोलनाबाबत पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा