कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ
-पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बाजारपेठ मिळत नाही, तर त्यांच्या कौशल्याचा विकास होत आर्थिक स्वावलंबनाचा मार्गही खुला होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून त्यांच्या आर्थिक उन्नतीस नवे बळ मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ च्या प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूल पटांगण, कुडाळ येथे करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी स्टॉल्सना भेट देत महिलांच्या उत्पादनांची पाहणी केली. हे प्रदर्शन २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे. या पाच दिवसीय प्रदर्शनात तब्बल ७५ स्टॉल्स सहभागी झाले असून, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादने पाहण्यासाठी व खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, माजी आमदार अजित गोगटे, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, सदस्य दिपक नारकर, दिपलक्ष्मी पडते,नागेश आईर, रुपेश कानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रकल्प संचालक उदय पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर,मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वेगुर्ला गटविकास अधिकारी व्हि. एम. नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, सिंधुसरस व मिनी सरस प्रदर्शन हे ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असून, स्थानिक उत्पादनांना व्यापक ओळख मिळवून देण्यासही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या माध्यमातून महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगारात वाढ होणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी असे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. अशा प्रदर्शनामुळे बचत गटाच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होते. आज एखाद्या बचत गटात ५ महिला कार्यरत असतील, तर पुढील वर्षी ही संख्या १५ पर्यंत वाढली पाहिजे. यासाठी बचत गटाने योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. या प्रयत्नांना जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच पालकमंत्री म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी कटिबध्द आहे. ‘सिंधुसरस’मुळे महिला उद्योजकतेला नवे बळ मिळत असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उपक्रम आहे. तसेच, नागरिकांनी केवळ उपस्थिती दाखवून न जाता महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सिंधुसरस हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव आहे, असे सांगितले. चुल आणि मुल या मर्यादित परिघातून बाहेर पडून महिला आता उद्योगक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करून महिलांना हातभार लावावा, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा प्रदर्शनांमुळे महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ मिळते, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीला गती मिळते. शिवाय अशा प्रदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रास्ताविकात या प्रदर्शनामागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले. सन २०१६ पासून आतापर्यंत बचत गटांसाठी सुमारे ८५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार बचत गटांमधून सुमारे १ लाख महिला जोडल्या गेल्या असून, या उपक्रमांमुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. पुढील काळात काही बचत गटांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समीर चराटकर यांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुरव यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयप्रकाश परब यांनी केले.
