You are currently viewing सामाजिक बांधिलकीचे अधिकारी : श्री जयंत नाईकनवरे आयपीएस

सामाजिक बांधिलकीचे अधिकारी : श्री जयंत नाईकनवरे आयपीएस

अमरावती :

 

31 डिसेंबर 2023 अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे यांचा सेवानिवृत्तीचा दिवस. अमरावती विभागाचे पाचही जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून असताना त्यांनी केलेले कार्य निश्चितच त्यांच्या कार्यकाळाला शोभा देणारे आहे. म्हणूनच भारताचे राष्ट्रपती यांनी त्यांना2023 यावर्षीचा राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरव केलेला आहे. सर अमरावतीला रुजू झाल्यापासून तर आज पर्यंत माझ्या संपर्कात आहेत. एक कर्तव्यदक्ष सामाजिक बांधिलकी जोपासणारा अधिकारी अशी त्यांची व्याख्या करावी लागेल. मिशन आयएएस हा उपक्रम अमरावतीच्या पाचही जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणी असलेल्या सुप्त गुणांना वाव करून दिला. त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचे मन स्पर्धा परीक्षेच्या अनुकूल बनवले. अगदी काल-परवा सेवानिवृत्त होत असताना देखील ते माझ्या आग्रहास्तव अकोल्याच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आले .वेळ सकाळी साडेअकरा वाजताची होती. पण त्या दिवशी नेमके मुख्यमंत्री अमरावतीला येणार असा शासकीय आदेश आला. मी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी अगोदरच अकोल्याला पोहोचलो होतो. सरांचा मला फोन आला आणि सरांनी मला मुख्यमंत्री येत असल्याची माहिती दिली. पण ते म्हणाले की मुख्यमंत्री गेले की मी विमानतळावरूनच अकोल्याला येतो. त्या दिवशी काही कारणास्तव मुख्यमंत्री बऱ्याच विलंबाने अमरावतीला आले. आम्ही दोघेजण एकमेकांच्या संपर्कात होतो. सर म्हणाले काहीही झाले तरी मी येणारच. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि चार ते पाचच्या दरम्यान मला सरांचा फोन आला की आता माननीय मुख्यमंत्री नागपूरला रवाना झालेले आहेत. आणि मी अकोल्यासाठी निघत आहे. सर अकोल्याला पोहोचले तेव्हा सायंकाळचे साडेसहा झाले होते. जवाहर नवोदय विद्यालयाच्या कार्यक्रम त्यानंतर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व नंतर कार्यक्रमानंतरचे जेवण हे सगळे करायला अकरा वाजले. पण सरांनी आपला शब्द पाळला होता. आपल्या एवढ्या व्यस्त कार्यक्रमातूनही मुख्यमंत्र्याचा दौरा असूनही सरांनी जवाहर नवोदय विद्यालय अकोला यासाठी दिलेला कार्यक्रम पूर्ण केला..

खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते अकोल्याचा जवाहर नवोदय विद्यालयाचा कार्यक्रम टाळू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांच्या हृदयामध्ये सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे .मी मागे लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो .15 ऑगस्ट ही ती तारीख .15 ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचलीहोती .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला होता.. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत.

एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन. सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. खरं म्हणजे आमची ही पहिली भेट होती .परंतु सरांनी माझे मनापासून स्वागत केले .त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक मला सप्रेम भेट दिले आणि तेही लेखक मी लेखक. ते आयपीएस तर मी मिशन आयएएस चालविणारा संचालक. आमचे हे समीकरण चांगलं जमलं .मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले.

संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर .म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही. एक तास झाल्यानंतर मी मुलांना आवरते घ्यायला सांगितले. म्हटले अरे सरांना खूप काम असतात. सर पाच जिल्ह्याचे पोलीस विभागाचे प्रमुख आहेत. साहेबच म्हणाले विचारू द्या त्यांना. काय विचारायचे ते ? मी वेळ काढूनच आलेलो आहे. ते विद्यार्थ्यांमध्ये रममान होऊन गेले.

कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. काही मुलांचे त्यांनी सत्कारही केले .एक डीआयजी अधिकारी विद्यार्थ्यांना इतका वेळ देतो. त्यांना आपलेसे करतो हे खरोखरच नोंदणीयअसे आहे. आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात .त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले .प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले .कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले.

पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके सप्रेम भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली .त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत .ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत. तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे. ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे. परवा सरांच्या मुलीचे लग्न झाले. सरांनी आठवणीने निमंत्रण पाठवले.

एक पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारी माझी आठवण ठेवून मला निमंत्रण देतो .लग्नासाठी निमंत्रित करतो. ही खरोखरच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती .सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांना निरोप देतो .आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देतो.

प्रा. डाँ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 10 =