You are currently viewing राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
Oplus_16908288

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई :

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक येथील खरात यांच्या अड्ड्यावर झालेल्या कारवाईनंतर चाकणकर या त्याच्या भक्त असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीसोबत आयोगाच्या अध्यक्षा यांचे नाव जोडले गेल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर तीव्र टीका झाली. राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आणि स्वेच्छेने पद सोडत असल्याचे नमूद केले आहे. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, खरात याला अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत हा मुद्दा उचलून धरला. या प्रकरणाला आणखी वळण मिळाले, जेव्हा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत चाकणकर या तंत्र-मंत्र करत असल्याचा आणि त्यांनी आपली अनामिका कापल्याचा खळबळजनक दावा केला.

तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकर यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित नेत्या असल्याने या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा रंगली होती.

अखेरीस वाढत्या विरोध आणि दबावामुळे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा