You are currently viewing ‘एसएसआय कॉम्प्युटर’च्या कौशल्य विकास उपक्रमाला प्रतिसाद; स्पर्धात्मक युगात अपडेट राहण्याचा संदेश

‘एसएसआय कॉम्प्युटर’च्या कौशल्य विकास उपक्रमाला प्रतिसाद; स्पर्धात्मक युगात अपडेट राहण्याचा संदेश

‘एसएसआय कॉम्प्युटर’च्या कौशल्य विकास उपक्रमाला प्रतिसाद; स्पर्धात्मक युगात अपडेट राहण्याचा संदेश

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन

सावंतवाडीत प्रमाणपत्र वितरण व नव्या प्रशिक्षण तुकड्यांचे उद्घाटन

सावंतवाडी

आजच्या धावपळीच्या आणि तीव्र स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवून थांबणे पुरेसे नाही, तर रोजगाराच्या बाजारपेठेत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना विद्यार्थ्यांनी ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी सातत्याने अपडेट राहिले पाहिजे. सतत शिकण्याची वृत्ती आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची तयारी असेल, तर यश निश्चित मिळते, असा विश्वास सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला.

जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा तसेच सन २०२५-२६ च्या नवीन प्रशिक्षण तुकड्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

कौशल्य विकासात खासगी संस्थांचे योगदान महत्त्वाचे
जिल्हाधिकारी म्हणाल्या की, प्रशासकीय कामकाज सांभाळताना नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या संधी कमी मिळतात. मात्र अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांशी संपर्क साधता येतो. प्रशासनाबरोबरच खासगी संस्था सामाजिक विकासासाठी पुढाकार घेत असतील, तरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होतो.

‘एसएसआय कॉम्प्युटर’ संस्थेने आतापर्यंत २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद करत संस्थेचे कौतुक केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला घराच्या चौकटीबाहेर पडून स्वतःच्या विकासासाठी आणि समाजासाठी कार्यरत आहेत, याचा अभिमान वाटतो. अनेक अडचणींना सामोरे जात त्या जिद्दीने पुढे येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच भविष्यात नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या डॉ. मुग्धा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, युवा उद्योजिका ऐश्वर्या शेठ कोरगांवकर यांच्या वतीने माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बाल धावपटू कबीर हेरेकर याचाही विशेष गौरव करण्यात आला.

कौशल्य विकास केंद्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कविता नाईक, सुखदा नाईक, मिताली केदार तसेच एसएसआय कम्प्युटरच्या ब्रँड अॅम्बेसेडर अनुष्का वर्दम यांचा सत्कार करण्यात आला. सिद्धी निखार्गे, पूर्वा कासार, भाग्यश्री राऊळ, संदेश गवस आणि संजना मातोंडकर या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन रघुनाथ तानावडे आणि डॉ. गौरी तानावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रघुनाथ तानावडे यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल मांडली.

यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील, स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, बॅ. नाथ पै संस्थानचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, इंद्रायणी शिक्षण संस्थानचे भूपतसेन सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा