You are currently viewing कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य उत्साहात
Oplus_16908288

कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस भव्य उत्साहात

राणे बंधूंची एकजूट ठळक; राजकीय दिग्गजांची उपस्थिती, कार्यकर्त्यांचा जल्लोष

“नितेश राणे माझी ताकद, आमच्यात फूट शक्य नाही” – निलेश राणे

कुडाळ :

कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मंगळवारी संध्याकाळी कुडाळ येथील मैदानावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला जिल्हाभरातून भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, सुमेधा पाताडे, संदीप कुडतरकर, काका कुडळकर, संजू परब, दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, संजय भोगटे, अभि गावडे, मंगेश चव्हाण, अरविंद करलकर, रोकेश कांदे, अशोक सावंत, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, देवेंद्र नाईक, दीपक पाटकर, ममता वराडकर, बाबू कुबल, प्रभाकर परब, आनंद मेस्त्री, विक्की तोरसकर, ओंकार तेली, अस्मिता बांदेकर, संजय वेंगुर्लेकर आणि प्रितेश राऊळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदारांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या जयघोषात वाढदिवसाचा केक कापण्यात आला. उपस्थित सर्व नेत्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार निलेश राणे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले की, “पालकमंत्री नितेश राणे हे माझे भाऊ आहेत आणि त्यांचा मला नेहमीच भक्कम पाठिंबा राहिला आहे. बाहेर कोणी काहीही वावड्या उठवू दे किंवा ‘स्टोरी’ तयार करू दे, पण माझं आणि नितेशचं नातं वेगळं आणि अतूट आहे.”

राजकीय वर्तुळात राणे बंधूंबाबत अनेकदा उलट-सुलट चर्चा रंगत असताना, निलेश राणे यांनी व्यासपीठावरून स्पष्ट भूमिका मांडली. “आमच्यात कोणालाही फूट पाडता येणार नाही. नितेशचा सपोर्ट हीच माझी मोठी ताकद आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी मोठ्या भावाचा केक भरवून आणि पुष्पहार घालून सत्कार केला. या प्रसंगामुळे राणे कुटुंबातील एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले की, “गेल्या दीड वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील दहा वर्षांत अपेक्षित विकास झाला नव्हता, तो भरून काढण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.”

ते पुढे म्हणाले की, मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असून, भविष्यात अधिक वेगाने विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी दत्ता सामंत यांचे कौतुक केले, तसेच निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

या भव्य सोहळ्यामुळे कुडाळ परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा