You are currently viewing भाईंदर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; उंदराच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू
Oplus_16908288

भाईंदर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; उंदराच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

ICU मधील निष्काळजीपणावर संताप; डॉक्टर-परिचारिका कार्यमुक्त, चौकशी सुरू

मुंबई :

भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या सुहासिनी माठेकर (वय ८५) या वृद्ध आजीचा उंदराने हात कुरतडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती गंभीर असल्याने सुहासिनी माठेकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र सकाळी नातेवाईक भेटायला गेले असता त्यांच्या बेडवर आणि जमिनीवर रक्ताचे डाग तसेच उंदराची पावले दिसून आली. उंदराने हात कुरतडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर मृत महिलेच्या कन्या मिलन माठेकर यांनी सोशल मीडियावर संपूर्ण प्रकार उघडकीस आणत रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला. ही बाब समोर आल्यानंतर नागरिकांमधून संतापाची लाट उसळली असून प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ड्युटीवरील डॉक्टर व परिचारिकांना तत्काळ कार्यमुक्त केले असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे भाईंदर परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा हा गंभीर प्रकार असल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा