९० टक्क्यांपर्यंत नुकसान; अधिवेशनातच पॅकेज जाहीर होण्याचे संकेत
पालकमंत्री नितेश राणे : “कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे”
मुंबई :
गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा व काजू बागायतदारांसाठी राज्य सरकारकडून लवकरच मोठ्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोकणचे संपूर्ण अर्थकारण आंबा-काजू उत्पादनावर आधारित असल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, यंदा कोकणात आंबा आणि काजू पिकांचे तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असून, अशी परिस्थिती गेल्या अनेक दशकांत प्रथमच निर्माण झाली आहे. या नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि इतरांनी आक्रमकपणे मदतीची मागणी लावून धरली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोकणातील शेतकरी कर्जफेडीबाबत प्रामाणिक असल्याने त्यांना प्रोत्साहन निधीत प्राधान्य मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नुकसानीचे तांत्रिक स्वरूप समजून घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळावी, ही कोकणातील जनतेची अपेक्षा असल्याचेही राणे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आंबा-काजू बागायतदारांसाठी मदतीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
सरकारच्या संभाव्य मदत पॅकेजमुळे संकटात सापडलेल्या कोकणातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
