मनिष दळवी यांचा विश्वास – दर्जेदार काजूला जास्त दर, प्रति किलो अनुदानासाठीही शासनाकडे पाठपुरावा
सिंधूनगरी / (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्नांना वेग आला आहे. राज्य काजू परिषद व काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक लाभदायक बाजारपेठ मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न सुरू असल्याची माहिती अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विकास सहकारी संस्था यांच्या समन्वयातून या उपक्रमाला गती देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा बँकेच्या सभागृहात काजू प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कारखानदार व बाजार समिती यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुमारे २५ ते ३० खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही केंद्रे कार्यरत केली जाणार असून, येत्या आठवड्याभरात याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात असल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले.
काजूच्या गुणवत्तेनुसार दर ठरविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून, चांगल्या प्रतीच्या काजूला अधिक दर देण्याचा निर्णय या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच, या केंद्रांमार्फत काजू विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा थेट लाभ देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रति किलो १० रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून, शासनाने मंजूर केलेले अनुदान या केंद्रांवर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास मनिष दळवी यांनी व्यक्त केला.
या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास राव राणे, काजू असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर तसेच जिल्ह्यातील काजू कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
