अस्थिव्यंग संगिता नाईक यांना दिलासा; साईकृपा संस्थेच्या पुढाकारातून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी मदत
अॅम्ब्युलन्सची तात्काळ व्यवस्था करून सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे तपासणी; पुढील शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संस्थेचा निर्धार
सिंधुदुर्ग
कसाल येथील सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने आरवली (ता. वेंगुर्ला) येथील अस्थिव्यंग असलेल्या व पूर्णतः खाटेवर असलेल्या सौ. संगिता नाईक यांना दिलासा देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे व त्यांच्या टीमला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्यांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली.
यावेळी संगिता नाईक यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले. आरवली ते ओरोस हे अंतर सुमारे 60 ते 70 किलोमीटर असल्याने साध्या वाहनाने प्रवास करणे त्यांना शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई (बाळू देसाई) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून 11 मार्च 2026 रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, ओरोस येथे नेण्यात आले.
सदर ठिकाणी शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. श्रीधर पवार, डॉ. निखिल अवधूत यांनी त्यांची तपासणी केली. या प्रक्रियेदरम्यान संस्थेचे सहसचिव सुनिल तांबे, ललित गावडे, महेंद्र नाईक, उपाध्यक्ष शामसुंदर लोट, आरवलीचे सरपंच समीर कांबळी, प्रसन्ना शिर्के तसेच इतर कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संगिता नाईक यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे संगिता नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
