You are currently viewing कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना दिलासा; नुकसानभरपाईचा निर्णय अंतिम टप्प्यात

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना दिलासा; नुकसानभरपाईचा निर्णय अंतिम टप्प्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही – अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वीच अधिकृत

नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना याच आर्थिक वर्षात भरपाई देण्याचा निर्धार

मुंबई (प्रतिनिधी) :

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत यांच्यासह कोकणातील सर्व आमदार आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आंबा व काजू पिकांचे झालेले नुकसान, हवामानातील बदलांचा परिणाम आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या वस्तुस्थितीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली.

“कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच आर्थिक वर्षात मदत देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाच्या अधिकृत घोषणेकडे कोकणातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असून, येणारा निर्णय त्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा