*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मला आवडे फार उन्हाळा* वृत्त : वनहरिणी
————————–
लाही होते अंगाची अन असह्य होतो ताप मनाचा
तरी मला पण फार आवडे चैतन्याचा मास उन्हाचा
जकरंडाने अंगण सजते सायंकाळी फुले मोगरा
येता जाता स्वागत करतो अमलताशचा लोलक हसरा
आम्रतरुवर दाटी होते करवंदाने जंगल फुलते
इवली, इवली फुले सानुली माडावरती झुलू लागते
आंबट चिंबट करवंदाचा स्वाद जरासा मिठास होतो
” राजा राणी ” खेळ मुलांचा ओटी वरती रंगत जातो
जुळून येती परिणय गाठी तारुण्याला फुटतो अंकुर
भरून जाती विवाह मंडप तनामनाला घाली फुंकर
स्वच्छ मोकळ्या नभांगणी मग चंद्र तारका दर्शन देती
माळावरती निरीक्षणाला छादीष्टांना येते भरती
पापड, कुरड्या बेत आगळे अंगण सारे भरून जाते
मदतीसाठी मुले धावती आनंदाने सारे न्हाते
पडदे लावून बाल नाटकें कोण कोण मग सादर करते
मुला मुलींच्या सुप्त गुणांना दुपारच्याला येते भरते
कधी तरी मग सायंकाळी अवचित येते सर वळवाची
संपून जातो ताप उन्हाचा सुटी संपते मे महिन्याची
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
16.03.2026
