You are currently viewing सिंधुदुर्गचा समृद्ध वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गचा समृद्ध वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गचा समृद्ध वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – तृप्ती धोडमिसे

घुंगुरकाठी’ संस्थेच्या वतीने आडाळी भवनला भेटीचे निमंत्रण…

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन वारसा अतिशय समृद्ध असून अश्मयुगीन कातळशिल्पांपासून ते प्राचीन मंदिरे आणि लोककला असा हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. निवृत्त माहिती उपसंचालक आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत तसेच उपाध्यक्ष व लेखिका डॉ. सई लळीत यांनी जिल्हाधिकारी धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या वारशासंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेली २५ वर्षे सातत्याने कातळशिल्पांचा अभ्यास करणारे सतीश लळीत यांनी आपले ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे संशोधनपर पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले आणि जिल्ह्याच्या या अश्मयुगीन प्रागैतिहासिक वारशाबाबत सविस्तर माहिती दिली. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत स्थान दिलेल्या कुडोपी येथील कातळशिल्प ठिकाणाला भेट देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. तसेच चिरेखाणी आणि रस्ते विकासामुळे या दुर्मिळ कातळशिल्पांसमोर उभ्या राहिलेल्या धोक्यांची माहितीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत श्रीमती धोडमिसे यांनी आपण लवकरच या कातळशिल्पांची प्रत्यक्ष पाहणी करू असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांचा हा प्रागैतिहासिक ठेवा जिल्ह्याचे वैशिष्ट्य असून त्याचे जतन, संरक्षण आणि प्रसिद्धीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न नक्की करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याचबरोबर कोकणी वास्तुशैलीची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आणि येथील विविध लोककला अतिशय समृद्ध आहेत, हा वारसाही त्याच्या मूळ स्वरूपात पुढच्या पिढ्यांसाठी जपला गेला पाहिजे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सई लळीत यांनी ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील ‘घुंगुरकाठी भवन’ला भेट देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच निसर्गरम्य आडाळी परिसर आणि आडाळी एमआयडीसीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा आशयाचे निवेदनही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा