युवापिढीचे विवाहानिमित्त आदर्श उदाहरण – पर्यावरणपूरक कमी कचरा विवाह सोहळा
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड परिसरात पार पडलेल्या चि. हृषिकेश मापारी आणि चि. सौ. कां. वैदेही पतकी यांच्या विवाहसोहळ्याने समाजासमोर पर्यावरणपूरक उपक्रमाचे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. या विवाह सोहळ्यात प्लास्टिकचा वापर कमी करत कचरा कमी करण्यावर आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आला.
सुमारे ८०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नामध्ये “या विवाहाचे ८ हरित संकल्प” या संकल्पनेतून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. पाण्यासाठी स्टीलच्या बाटल्या व ग्लास, जेवणासाठी मेलामाईन प्लेट्स, स्टील चमचे आणि काचेचे ग्लास, तसेच प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरून एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना पूर्णपणे फाटा देण्यात आला.
कार्यक्रमामध्ये ओला व सुका कचरा वेगळा संकलित करून योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचरा वेगळा ठेवण्यासाठी समारंभाच्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक (बोर्ड) लावण्यात आले होते. तसेच कार्यक्रम नंतर अन्नकचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आणि अन्न वाया जाऊ नये यासाठी पाहुण्यांना आवश्यक तेवढेच अन्न घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांमध्येही मापारी कुटुंबाने स्टीलच्या भांड्यांचा वापर केला. तसेच पाहुण्यांच्या राहण्याच्या ठिकाणी प्रत्येक खोलीत स्टील पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या, त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला.
आजच्या युवक-युवतींनी विवाहासारख्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. हा उपक्रम केवळ लग्नातील व्यवस्था नसून भावी आयुष्यासाठीचा पर्यावरण जपण्याचा संकल्प असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत उपक्रमांना शहरात पुढे नेण्यासाठी अशा प्रकारचे पर्यावरणपूरक कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, असा सकारात्मक संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला.
या संपूर्ण संकल्पनेचे नियोजन सावरकर मंडळाचे श्रीकांत मापारी, धनंजय शेडबाळे, भास्कर रिकामे तसेच इको इव्हेंट्स इंडिया यांच्या रेश्मा बोरा आणि गणेश बोरा यांनी केले.
छोट्या बदलांमुळे मोठा परिणाम होऊ शकतो हा संदेश देत या युवा दांपत्याने समाजाला जणू आवाहनच केले आहे की वसुंधरेला कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने कृतीतून पुढे यावे. केवळ कायदे करून नव्हे तर मनापासून पर्यावरण जपण्याची भावना असेल तरच आपली सुंदर वसुंधरा हरित आणि स्वच्छ राहू शकते.
येणाऱ्या काळात अशा प्रकारचे पर्यावरणपूरक विवाह मोठ्या प्रमाणात साजरे व्हावेत यासाठी जागृती मोहीम राबविणे तसेच आवश्यक मार्गदर्शन आणि माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक आणि कमी कचऱ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इको इव्हेंट्स इंडिया हे वन स्टॉप सोल्यूशन उपलब्ध करून देण्यास कार्यरत राहत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
Eco Events India
www.ecoEventsIndia.com
मोबाईल : ८८८८८७०७०३
