कुडाळ MIDC मध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; ३० उद्योगांचे उत्पादन ठप्प
कुडाळ :
कुडाळ औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे सुमारे ३० उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक उद्योगांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला हा अत्यावश्यक घटक अचानक उपलब्ध न झाल्यामुळे अनेक उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रिया थांबली आहे.
कुडाळ MIDC मधील काही उद्योग निर्यात व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांचे परदेशी ग्राहकांशी करारबद्ध व्यवहार आहेत. उत्पादन बंद पडल्यामुळे करारातील अटी पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत असून उद्योगांना आर्थिक नुकसान आणि दंडात्मक कारवाईचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शासनाकडून पूर्वी देण्यात आलेल्या सूचनांवर विश्वास ठेवून अनेक उद्योगांनी व्यावसायिक गॅसचा अतिरिक्त साठा केलेला नव्हता. मात्र अचानक सेवा बंद झाल्याने उद्योगांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कुडाळ MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा त्वरित व नियमित सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच उद्योगांना झालेल्या आर्थिक नुकसानीबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांनाही देण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
