You are currently viewing लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर डॉ. धनंजय भिसे; हेमंत हरहरे यांच्याकडून सत्कार

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर डॉ. धनंजय भिसे; हेमंत हरहरे यांच्याकडून सत्कार

चिंचवड पुणे –

महाराष्ट्र शासनाच्या दि. ६ मार्च २०२६ रोजीच्या शासन आदेशानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदी डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. हेमंत हरहरे यांनी चिंचवड येथे त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले.

पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि जीवनकार्य समाजापर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्याचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे होऊन त्यांचे विचार आणि संघर्षमय जीवनकार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा श्री .हेमंत हरहरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पुढे बोलताना हेमंत हरहरे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त साहित्यिक होते. त्यांच्या लेखनातून समाजातील वंचित, शोषित आणि सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचे जिवंत आणि वास्तव चित्र उभे राहते. सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये आणि परिवर्तनाची प्रेरणा यांचा संगम त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो. देव, धर्म आणि देशाबद्दल त्यांच्या लेखनात अति टोकाचा, अतिरेकी किंवा आक्षेपार्ह उल्लेख आढळत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार अधिक व्यापक प्रमाणात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ.धनंजय भिसे म्हणाले, “माझ्याकडे कोणताही वशिला नाही, तसेच सधन किंवा राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीही लाभली नाही. तरीदेखील मला या समितीवर काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. ही संधी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारामुळेच मिळाली असावी, असा माझा ठाम विश्वास आहे.”

भिसे पुढे म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या चरित्र आणि साहित्यावर काम करण्याची संधी मिळणे ही केवळ जबाबदारी नसून एक प्रकारची वैचारिक साधना आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य माझ्या जीवनाला दिशा देणारे, संघर्षाला बळ देणारे आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी मिळालेली ही संधी ते सामाजिक कर्तव्य आणि वैचारिक बांधिलकी म्हणून स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.

या समितीचे सचिव म्हणून शिवा कांबळे यांची निवड झाली असून इतर सदस्यांमध्ये डॉ. सुनील भंडगे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. बळीराम गायकवाड, सचिन साठे, गणेश भगत, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. संपत जाधव, सुरेश पाटोळे, सोपान खुडे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, माधव गादेकर, कु. योगिता साळवी, डॉ. उज्वला मोरे, प्रा. रूपाली अवचरे, डॉ. पांडुरंग ऐवळे आणि चंद्रकांत केंगार यांचा समावेश आहे.

या सर्व सदस्यांचेही यावेळी शाब्दीक अभिनंदन हे हरहरे यांच्याकडून करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा