*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अतिशय आवडते भजन !
विचार केला तर सद्य स्थितीत सुद्धा लागू पडणारे हे भजन माझ्या आईला ही खूप आवडतं असे. खूप तल्लीन होऊन ती हे भजन नेहमी म्हणत असे. आजच हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपले आवडते प्रबंध संपादक श्री विलास मराठे ह्यांचा कालचा लेख ! शीर्षक होते ,देव वागण्यावर पावतो, मागण्यांवर नाही संपूर्ण लेख संवेदनशील मनाला अधिक विचार करायला लावणारा आहे. वाचतांना प्रत्येकवेळी नवीन मुद्दा लक्ष्यात येतो ! खुप खरं आहे हे की देव आपल्या मागण्यांवर नाही तर वागण्यावर पावत असतो. एखादी व्यक्ती देवाची तासनतास पूजा करत असेल पण त्याच वेळी तिचे लक्ष दिवसभर काय करायचं आहे ह्यावर असेल, तर त्या पूजेचा काय उपयोग?मानवी स्वभावच असा आहे की आपण देव आहे म्हणतो पण त्याची उपासना त्याला आवडेल अशा पद्धतीने कधीच करत नाही. आपल्याला काहीतरी हवं असतं, मनात काही इच्छा असते, व ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली भक्ती सुरू असते , देवा मला हे दे ते दे त्याबद्दल मी असं करीन , तसं करीन असं आपलं सुरू असतं, देव काय व्यापारी आहे की आपण कबूल करू त्याबदल्यात तो आपल्या इच्छा पूर्ण करील! मागणीच्या सिद्धांतानुसार आपल्या मागण्या , इच्छा मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच जातात त्यासाठी मागणीच्या लहान मोठेपणावर भक्ती अवलंबून असते, देवाला हे बिलकुल आवडत नाही. राष्ट्रसंत म्हणतात त्याप्रमाणे देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? “जेव्हडी चांगली भाजी तेव्हडे तिचे भाव जास्त! स्वतःला विशिष्ट देवदेवतांचे उपासक म्हणवून घेणाऱ्या तथाकथित भक्तांनी मनाशी खूणगाठ बांधून घ्यायला हवी की देव वागण्यावर पावतो, मागण्यांवर नाही मागणी जेव्हडी जास्त तीव्र, तेव्हडी भक्ती जास्त, असं कितपत योग्य आहे? देवाला तुमचे छप्पन भोग नकोत तर तुमचे सत्शील वागणे हवे असते दीन दुबळ्यांची सेवा, अनाथ व्यक्तींना आधार , आजारी व्यक्तीची सेवा आणि दुसऱ्याशी गोड वागणे गरजवंताला मदत आणि प्रामाणिक व्यवहार ,आपण करीत असलेल्या कामाशी बांधिलकी, नम्र वागणूक असे अनेक प्रकार आहेत की ज्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होईल अवतार मेहेरबाबा म्हणतात, Real happiness lies in making others happy.
सगळे धर्म पंथ हेच सांगतात नाही का? साने गुरुजी म्हणतात, करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे लाडू कुठूनही खा तो गोडच लागणार ना? इतकं सोपं आहे देवाची भक्ती करणे तुमचं वागणे सुधारा, आपल्या बोलण्याने , वागण्याने कुणी दुखावणार नाही ही काळजी घ्या, देव तुमच्या जवळच तुम्हाला दिसेल अगदी श्वासाजवळ! आपल्या प्रत्येक कृतीने प्रत्येक बोलण्याने देव आपल्यावर प्रसन्न होऊ शकेल! गरज आहे जागे होण्याची अंधविश्वासाची डोळ्यावरील पट्टी काढण्याची
आणि मग तुम्हाला पटेल खरंच, देव वागण्यावर पावतो , मागण्यांवर नाही !
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
