जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती; १५ ते १७ मार्चदरम्यान नाट्य महोत्सव व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
सावंतवाडी :
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच १५, १६ व १७ मार्च या कालावधीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात येणार आहे. राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी असला तरी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमुळे ते १५ मार्च रोजी सावंतवाडीत उपस्थित राहणार आहेत.
त्या दिवशी त्यांच्या उपस्थितीत शिव उद्यान येथे नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होऊन वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली. तसेच सर्व रसिक नागरिकांनी या नाट्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
