You are currently viewing आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जिल्हा बँकेकडून पीक कर्जावर अतिरिक्त २% व्याज सवलत

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जिल्हा बँकेकडून पीक कर्जावर अतिरिक्त २% व्याज सवलत

आंबा व काजू पिकांच्या कर्ज मर्यादेतही वाढ; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ – अध्यक्ष मनीष दळवी

सिंधूनगरी (प्रतिनिधी) :

सन २०२६ च्या पिंक हंगामात अवकाळी पाऊस, दाट धुके तसेच खार/दवामुळे झालेल्या हवामान बदलाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू पीक हंगामात (सन २०२५-२६) विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत किंवा थेट बँकेकडून बागायती पीक कर्ज घेतलेल्या शेतकरी कर्जदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज दि. ३० जून २०२६ पर्यंत नियमितपणे फेडले असेल, त्यांना लागू असलेल्या नियमित व्याजदरावर बँकेकडून अतिरिक्त २ टक्के व्याज सवलत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

तसेच पुढील सन २०२६-२७ हंगामासाठी आंबा व काजू पिकांच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा ५० हजारांनी वाढवून ती रु. २,२५,००० वरून रु. २,७५,००० करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध होणार आहे.

तर काजू पिकासाठी प्रति हेक्टरी कर्ज मर्यादा रु. १,७५,००० वरून रु. २,००,००० करण्यात आली असून त्यामुळे प्रति हेक्टर २५ हजार रुपयांची वाढ होणार आहे.

दरम्यान, रु. ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शेतकऱ्यांनी नियमित व मुदतीत परतफेड केल्यास केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ३ टक्के, अशा एकूण ६ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळून हे कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होऊ शकते.

आंबा व काजू पीक कर्जावर लागू करण्यात आलेल्या २ टक्के अतिरिक्त व्याज सवलतीचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा