जागतिक महिला दिनानिमित्त ‘प्रथम ती – सक्षम ती’ पर्व ५वा सोहळा दिमाखात संपन्न
रेडी
रेडी परिसरातील गावतळे–गोळतुवाडी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “प्रथम ती – सक्षम ती” पर्व ५वा हा विशेष सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच सन्मा. नामदेव शिवाजी राणे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मा. रामसिंग (भाई) राणे, सरपंच रेडी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्राची राणे (BAMS, MUHS), डॉ. मेघना सूर्याजी (BHMS), आरोग्य विभाग अधिकारी श्रीम. अंकिता तोरसकर, तसेच शिक्षिका सौ. प्रज्ञा आरेकर (मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी) उपस्थित होत्या. याशिवाय पोलिस पाटील श्री. सुमित राणे, माजी उपसरपंच सन्मा. राजेंद्र राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मा. गुणाजी मांजरेकर आणि गावतळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गोळतुवाडी येथील महिलांनी ईशस्तवन सादर केले. मान्यवरांचे स्वागत व परिचयानंतर माजी उपसरपंच नामदेव शिवाजी राणे पुरस्कृत विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नाव कमावलेल्या युवतींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सरपंच भाई राणे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. प्राची राणे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले, तर डॉ. मेघना सूर्याजी यांनी महिलांनी स्वबळावर आपले अस्तित्व कसे निर्माण करावे यावर मार्गदर्शन केले. आरोग्य अधिकारी अंकिता तोरसकर, शिक्षिका प्रज्ञा आरेकर, तसेच पोलिस पाटील सुमित राणे आणि माजी उपसरपंच राजेंद्र राणे यांनीही महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले.
यानंतर महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साक्षी सचिन राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. श्रुती ज्ञानेश्वर केरकर यांनी केले.
गावतळे–गोळतुवाडी महिला मंडळाने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले. उपस्थित महिला व मान्यवरांनी या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते सन्मा. नामदेव शिवाजी राणे यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी गावतळे–गोळतुवाडी येथील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

