सावंतवाडी दि. २२/०२/२०२१
कोरोनासारख्या भीषण महामारीमुळे अनपेक्षितरीत्या उद्भवलेली भयावह परिस्थिती त्यामुळे समाजातील सर्वच घटकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण आणि आरोग्यसेवेच्या सुविधांचा अभाव, अशाही परिस्थितीत त्याकाळात अनेक सामाजिक संस्थांनी प्रशासनाशी समन्वयाने काम करून अनेकांना मदतीचा हात दिला. सामाजिक संस्थांच्या योगदानामुळे अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला . अशा प्रतिकुल परिस्थितीत सामाजिक संस्थाचं योगदान कौतुस्कापद आहे, असे गौरोद्गार ‘साहस’ या अपंग पूर्नवसन न्यासाच्या अध्यक्षा डॉ. नसीमा हुरजुक यांनी काढले.
गीतरामायण फाऊंडेशनने जिल्हा स्तरावर आयोजित केलेल्या “कोरोना काळात मला आलेला सकारात्मक अनुभव” या विषयावरील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतरामायण फाऊंडेशनचे कार्यवाह ॲड.नकुल पार्सेकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नजीकच्या काळात शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी गीतरामायण फाऊंडेशनच्यावतीने विविध शालेय उपक्रम राबविण्याचा संकल्प जाहीर केला. यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना कॉनबॅक बांबूपासून बनवलेली आकर्षक श्रीगणेशाची स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन डॉ. नसीमा हुरजुक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक विजेत्या श्रद्धा सतिश पाटकर, कणकवली हीने आपल्या मनोगतात गीतरामायण फाऊंडेशनने कोरोना या महामारीशी संबंधित निबंध स्पर्धेचे आयोजन करून आपल्याला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल फाऊंडेशनचे आभार मानले.
कार्यक्रमाला फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. मंदा परब, खजिनदार श्री. प्रकाश दळवी, विश्वस्त सौ. तृप्ती पार्सेकर, साहस या अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त साताराम पाटील व सौ. मधु पाटील इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्पिता वाटवे यांनी केले.
(फोटो कॅप्शन – विजेत्या स्पर्धकांना गौरविताना डॉ. नसीमा हुरजुक, ॲड. नकुल पार्सेकर,श्रीम. मंदा परब, श्री. प्रकाश दळवी व इतर मान्यवर)