You are currently viewing स्त्रीमन
Oplus_16908288

स्त्रीमन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*स्त्रीमन*

🖊️ अनुराधा जोशी

 

जन्मानेच तिला स्त्रीत्व चिकटते. माहेरी ती जन्माला येते. माता पिता, आजोळ, सारे मायेचे आभाळ ऊभे करतात. आजी आजोबा तर मायेच्या पांघरूणातच ….. गोधडीतच गुरफटून ठेवतात. भावंडे रेशमी मायापाशात जखडून टाकतात. या .. माहेरच्या अंखणात ती झुल्यात झुलते, पैंजण वाजवत नाचते, धावते, गाते. अंगणातली फूले तोडते. आई बाबांबरोबर गुजगोष्टी करते. हंसते. खिदळते. असं आईच्या कूशीत, बाबांच्या सावलीत, आजीआजोबांच्या मायेत, भावंडांच्या रेशमी पाशात ती कधी मोठी होते कळत नाही.

एक दिवस हळुच ती आईच्या पदराआडुन बघते. निश्चिंत, मोकळं, निर्भय, निरागस, खेळकर आयुष्यात गुंतलेली ती एक दिवस ऐकते. … आता तू मोठी झालीस.. असं वागायच.. तसं वागायचं.. हे करायचं नाही.. ते केलेच पाहिजे. घरकाम स्वैंपाक वीणकाम भरतकाम असं काहीबाही शिक. परक्याच्या घरी जायचं आहे. .

मग! हे घर कोणाचं? जिवाची तगमग होते आणि बहिणींना समजतं हे घर फक्त भावाचं आहे… आपण हे माहेरचे अंगण सोडून जायचं आहे.

अशा नकळत्या वयात स्त्रीमनाची खरी कहाणी सुरू होते. भेदभाव का? हे समजत नाही.

पुढे शिक्षण, मैत्रिणींची लग्ने यातुन… परकं घर..

समजू लागतं. आणि मनात आपल्याला कसं घर मिळावे?… जोडीदार कसा असावा.!या कल्पना खेळ मांडू लागतात.

आई बाबांना घोर लागतो. चांगलं स्थळ मिळावे म्हणुन आटापिटा, पायपीट करतात. मनातुन खचलेले असतात. कारण इतके दिवस हौसेने लाडकौड कौतुक करत मायेनी वाढवलेला हा पोटचा गोळा … अंतरातला ठेवा. आनंदाची खाण अशी दुसर्यांना द्यायची. काळीज फाटणारच.

कोणाला नकोशी झाली म्हणुन का कोणी परक्याला देतं,?

पण समाजरहाटीच तशी आहे. तिचं स्वत:चं घर, कूळ, नाव गाव, प्रतिष्ठा, मिळावं यासाठी शोभेसा जोडीदार, घरसंसार, मुलबाळं, मिळण्यासाठी, मालकीहक्क मिळण्यासाठी तिला म्हणजे फक्त स्त्रीलाच माहेरचा ऊंबरठा ओलांडुन यावे लागते.

सगळी आपली माया ममता, नातीगोती, गाव नाव सारे सोडून यावे लागते.

माहेरच्या अंगणातली तुळस सासरच्या अंगणी लावली जाते.

आता इथे एक जोडीदार सोडला कि, ज्याच्यावर सगळा विश्वास ठेऊन ती इथे आली आहे… बाकी घर दार , गणगोत, गाव नाव घरपण सारेच अनोळखी असते.

ती माहेरचे अंगण आठवत सासरच्या अंगणी रूजायचा प्रयत्न करतात. तिच्या नशिबाप्रमाणे तिला धक्के, टिका, टोमणे, हुंड्याचा लोभ, कधी मारझोड, कष्ट सोसावे लागतात. कधी छान गुलाबाच्या पायघड्यांवर आयुष्य सरते.

यथावकाश मुलं बाळं होतात आणि पुन्हा आयुष्य बदलतं. ती त्या घरात सामावली जाते. परकेपणा संपतो. सगळी नाती गोती घरपण, घरकाम, आवड , माया, सारे तिचेही होते. आता तुळस खरोखरची रूजते. जगते.

तिच्या तोंडी माझं गाव माझं नाव माझे घर माझी नाती, माझी मुले ,माझी माणसे असं येतं आणि ती रूळते. सर्वांना ती आपलीशी वाटते. कोणाची सून, कोणाची वहिनी, जाऊ, भावजय,काकू शेजारीण, मैत्रिण अशी सारी मायेची नाती तिच्याभोवती तिला गुरफटुन टाकतात. ती त्यांचीच होते. घरच्या रितीरिवाज,क्षरूढी, परंपरा, कूळाचार आनंदाने आपुलकीने पाळते.

आपल्या घराची माणसांची नात्यांची काळजी घेते. नावलौकिक वाढवते. संसाराला जखडुन घेते. काटकसर करते. पैसा हाताशी राखते. सारे काही तिच्या घरपणासाठी करते.

कोणाचे केळवण, तर कधी डोहाळजेवण, कधी लग्नकार्य सगळ्यात प्रतिष्ठेने मिरवते.

आपल्या आईवडिलांना आपलं सुख सांगते. भावंडांशी संबंध राखते पण आपल्या घराचा मात्र तिला प्रचंड अभिमान, जोडीदाराचे कौतुक असते.

मित्र, बंधूसखा, पती, लेकरांचा बाबा अशा अनेक नात्यातुन तो म्हणजे तिचे सर्वस्व होऊन बसतो. अशा सुखाच्या वळणावर ती लवकरच सासू बनते.. आजी बनते.. आणि तिथेच तिचा प्रवाह शांत होतो.. आता विसाव्याचे क्षण हळुवार आनंदात समाधानात गुंफायचे असतात. आसपास सुनबाई, जाव ई, नातवंडे सगळी सायसाखरी नाती असतात.

तिच्या मनात येतं यासाठीच तर केला होता अट्टाहास. दूधात साखर कधीची विरघळली. समजलंच नाही.

इथे संपते स्त्रीमनाची कहाणी.

प्रतिक्रिया व्यक्त करा