You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान

*जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान*

*कष्ट, जिद्द आणि संघर्षाला मानाचा मुजरा; विद्यार्थ्यांसमोर उभा केला मेहनती जीवनाचा प्रेरणादायी आदर्श*

*बांदा*
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत करणाऱ्या या महिलांच्या कष्टाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सध्या गावात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामासाठी कर्नाटकातील विजापूर या दूरवरच्या भागातून अनेक महिला मजूर येथे कामासाठी आल्या आहेत. उन्हातान्हात, धूळमातीमध्ये दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा संसार चालविणाऱ्या या महिलांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षमय आणि मेहनती जीवनाला मानाचा मुजरा देत घारपी शाळेच्या वतीने महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कष्टकरी महिलांचे ढोल- ताशाच्या गजरात करत विद्यार्थ्यांना शाळा परिसरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून बनवलेलले पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात केले. या सन्मानामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या मेहनती महिलांचे स्वागत करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी विद्यार्थी,शिक्षक व मान्यवरांनी महिला सन्मान, आईचे महत्त्व आणि स्त्रीशक्ती यावर आधारित मनोगते व्यक्त केली. महिलांच्या संघर्षमय जीवनावर आधारित कविता व लघुभाषणे “स्त्री ही शक्ती आहे”, “कष्ट आणि जिद्दीने जीवन घडवणाऱ्या महिलांना सलाम” अशा भावना व्यक्त केल्या. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. अनेक महिला कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबाचा संसार सांभाळतात आणि समाजाच्या विकासातही आपला वाटा उचलतात. अशा महिलांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कष्टांचे आणि त्यागाचे कौतुक करण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांनी अशा मेहनती महिलांकडून परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास यांचे धडे घ्यावेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. तसेच समाजातील कष्टकरी महिलांचे कार्य आणि त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील , सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, वासुदेव नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या वतीने कष्टकरी महिलांसाठी आयोजित केलेल्या या सन्मानाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.शाळेच्या या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी सविता परब व विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, केंद्रप्रमुख आर .बी. गावडे यांनी विशेष कौतुक केले आहे

.

*कष्टकरी महिलांचा सन्मान करतेवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष यशोदा गावडे मुख्याध्यापक जे.डी.पाटील व अन्य*

प्रतिक्रिया व्यक्त करा