यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढाकारातून कोल्हापुरात १३ मार्चला भव्य रोजगार मेळावा
निवड झालेल्यांना तत्काळ नियुक्तीपत्र
कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (विभागीय केंद्र कोल्हापूर), विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि युवाशक्ती फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
युवाशक्ती फाऊंडेशन, पुणे ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून देशातील युवकांच्या कौशल्य विकास, शिक्षण, समुपदेशन, प्रशिक्षण आणि ऑन-जॉब ट्रेनिंग क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे कार्य देशभर पसरलेले असून पात्र विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगारक्षम बनविण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेषतः ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, सीएनसी मशिनिंग, टूलरूम, फार्मा व केमिकल उद्योग, फूड प्रोसेसिंग व पॅकेजिंग, फाउंड्री-फोर्जिंग, फॅब्रिकेशन, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, सप्लाय चेन, प्लास्टिक, रबर आणि टेक्सटाईल अशा विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या संयुक्त उपक्रमातून राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, उद्योग अनुभव आणि करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे १५,००० ते ३०,००० रुपये इतके विद्यावेतन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षण काळात निवास, भोजन व वाहतूक याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. वय वर्षे १८ ते ३५ दरम्यान असलेल्या बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, पदविका, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक पदवीधारक विद्यार्थी आणि विविध विद्यापीठांत शिक्षण घेत असलेले पात्र विद्यार्थीही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.
या रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर नोंदणी करून सहभाग नोंदवावा.
नोंदणी लिंक : https://forms.gle/U77MWgbTPnuwdHbX9�
गरजू आणि पात्र युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
